Type Here to Get Search Results !

मुखी भारताच्या पुन्हा एकदा लोणी, आफ्रिकेच्या मुखी फक्त अंगार... विठ्ठला, तु वेडा कुंभार !

"मुखी भारताच्या पुन्हा एकदा लोणी, आफ्रिकेच्या मुखी फक्त अंगार... विठ्ठला, तु वेडा कुंभार !"


षटकारात जाणारा चेंडू सुर्यकुमारने धावत सिमारेषेजवळ पकडला, तोल जातोय हे समजताच त्याने षटकारात पाऊल टाकलं आणि तत्पुर्वी तो चेंडू हवेत उडवला, क्षणात सिमारेषेच्या आत येऊन तो चेंडू पुन्हा टिपला! एबी डिव्हीलियर्सने असे झेल पाच वेळा घेतलेत, आणि डग बॉलिंगरने दोन वेळा!

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात कुलदीपच्या गोलंदाजीवर, अक्षर पटेलने स्टॉईनीसचा झेल घेतला, तो झेल देखील खुपच भन्नाट झेल होता!

सुर्यकुमारने डेव्हिड मिलरचा हा अफलातून झेल घेत, दक्षिण आफ्रिकेच्या घशातून सामना हिसकावून घेतला, हा फक्त सामनाच नव्हता, हा विश्वचषक होता! माझ्या हातात जर असतं, तर मी विचार न करताच सुर्यकुमार यादवला सामनावीरचा पुरस्कार शुन्य मायक्रो सेकंदात देऊन टाकला असता!

किंग कोहली बार्बाडोस च्या मैदानावर आज जबरदस्त खेळला, त्याचं ॲग्रेशन आणि क्रिकेट प्रती असलेला उत्साह जगाला थक्क करणारा असतो, तो शांतपणे खेळताना मला बिल्कुल आवडत नाही! विवीयन रिचर्डसचा उफलातून खेळ आणि रिकी पोंटींगची ॲग्रेसीव मस्ती, या दोघांचा सुरेख संगम मला विराट कोहली मध्ये दिसून येतो!

तो भावना लपवणारा माणूस नाही! राग, दुःख, प्रेम, आणि निराशा त्याच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे जाणवतात! कधी कधी त्याच्या भावना त्याचं अख्खं शरीर बोलून दाखवतं असतं!

दुर्दैवाने या विश्वचषकात त्याचा सूरच हरवला, सलामीला खेळताना त्याला प्रचंड जड जात होतं! सलामी म्हणजे त्याच्या साठी शिखंडी बनली होती, आणी तो जणू भीष्म पितामह! पण आजच्या अंतिम युद्धात त्याने शिखंडीला भेदून काढलं, ती भेदताना त्याची नजाकत अत्यंत सावधरीत्या होती!

विराट कोहली हा आजच्या काळातील आधुनीक भीष्म पितामह आहे, तो कमालीचा अपडेट वर्जिन आहे, तो जास्त काळ आगतिक राहूच शकत नाही! समुद्रा सारखं उसळणं हे त्याच्या रक्तातच आहे, आज त्याची सुरूवात सुनामी सारखीच झाली होती! सामन्याच्या सुरूवातीलाच भारताची ८ चेंडूत नाबाद २३ धावांची उसळी, आणि पापणी मिटायच्या आतच ३३ धावांत ०३ बळींची गटांगळी! उगीच म्हणत नाहीत, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे! 

भारताची दयनीय अवस्था पाहून विराटने आपला गिअर बदलला, आणि सावध पवित्रा घेतला! संघ सुस्थितीत आल्यानंतर तो आक्रमक झाला, त्याने ५९ चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकाराच्या सहाय्याने ७६ धावा काढल्या!

तत्पुर्वी गटांगळी खाणाऱ्या भारताच्या जहाजाला अक्षर पटेलने सुस्थितीत आणलं, पुढे राहून लढणारा सेनापती सारखा आज तो जिगरबाज रीत्या लढला! त्याच्या फलंदाजीच्या सौंदर्याला आज कुठेही गालबोट नव्हता, त्याने धावबाद होऊन आपल्याच खेळीला स्वतःहून दृष्ट लावली! त्याने ३१ चेंडूत ४७ धावा खेचल्या! 

त्याने फटके देखील इतक्या सहजपणे मारले जसे की, जसा तो एखादा मातब्बर फलंदाज आहे! माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं, तसे ते फटके इतक्या सराईतपणे गेले! रखरखीत बार्बाडोसच्या पीचवर त्याने जाई, जुई, चमेली, मोगरा आणि गुलाब फुलवला! त्याचं फुटवर्क त्याचा आत्मविश्वास दाखवत होता, तो एखाद्या नर्तकासारखा पाय हलवत होता! त्याने मारलेले चार षटकार तर इतके भन्नाट होते, की डोळ्यासमोरून अजुनही ते जात नाहीत! असं वाटत होतं कि ते चेंडू स्वतःहून अक्षरच्या बॅटवर आवडीने आलेत, आणि आनंदाने पंख फुटून हंस पक्षी होऊन आकाशात उडालेत!

शिवम दुबे ने १६ चेंडूत २७ धावाची महत्त्वपूर्ण खेळी केली!

भारताच्या १७६ धावांचा पाठलाग करणार्‍या आफ्रिकेच्या हेन्रीक्स आणि मार्कौ जॉन्सनच्या दांड्या, जसप्रीत बुमराह ने उडवून टाकल्या, त्यांना आज रात्रभर झोप आली नसेल! अर्शदीप ने मकरम आणि डिकॉक ला बाद केलं, अक्षर पटेल ने स्टब्सची दांडी उडवली, आज अक्षर आणि कुलदीप कमालीचे महागडे ठरले!

क्लासेन ने २७ चेंडूत ५२ धावांची झुंजार खेळी केली, त्याने भारतीय चाहत्यांचा जीव भांड्यात टाकला! क्लासेन ने संपूर्ण सामनाच फिरवला होता, तेवढ्यात हार्दिक पांड्या गोलंदाजीला आला! त्याने टाकलेला चेंडू क्लासेनच्या फलंदाजीवर इतका फिदा झाला, की त्याच्या बॅटचं चुंबन घेऊन तो चेंडू हवेत उडाला आणि रिषभ पंतच्या बाहुपाशात अलगदपणे विसावला! आक्रमक लयीत असलेल्या डेव्हिड मिलरला देखील हार्दिक पांड्यानेच बाद केले, नंतर त्याने रबाडाला बाद केले!

विराट कोहली सामनावीर आणि जसप्रीत बुमराह मालिकावीर ठरला!

रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक झालेल्या या सामन्यात, विजयानंतर संपूर्ण भारतीय खेळाडू मैदानातच रडू लागले, तो प्रसंग पाहून मला प्रचंड आनंद झाला! आणि मी देखील मनसोक्त रडून घेतलं, कारण आनंदाश्रू होते ते, त्याला मनमोकळं वाहू देणं आवश्यक होतं...

       अभिनंदन टीम इंडीया !! 🇮🇳 🇮🇳

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News