Type Here to Get Search Results !

केंद्रीय मंत्री मोहोळ यांचा सुरक्षा जवानांना ‘सॅल्यूट’ला नकार

केंद्रीय मंत्री मोहोळ यांचा सुरक्षा जवानांना ‘सॅल्यूट’ला नकार

साधेपणाने भारावले महाराष्ट्र सदनातील सुरक्षा जवान


नवी दिल्ली/पुणे : केंद्रीय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळालेले पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ सध्या दिल्लीत आहेत. मात्र, त्यांच्या वागण्यातील साधेपणा इथे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनाही अनुभवायला मिळतो आहे. त्यांना सॅल्यूट करणाऱ्या महाराष्ट्र सदनातील सुरक्षा जवानांनाही बुधवारी याचा अनुभव आला. ‘मला सॅल्यूट वगैरे करू नका, नमस्कार केला नाही तरी चालेल!’ अशा शब्दांत मोहोळ यांनी त्यांची मने जिंकली.       

सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने सर्व संसद सदस्य दिल्लीत आहेत. त्यामुळे सतत सतर्क असलेली इथली सुरक्षा यंत्रणा सध्या अधिक दक्ष आहे. देशभरातील नवनवीन खासदारांचा या परिसरात राबता आहे. त्यातच मंत्रिपदाची जबाबदारी मिळालेले काही चेहरेही प्रशासनाच्या दृष्टीने नवीन आहेत.

पुण्याचे खासदार म्हणून निवडून गेलेले मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात पहिल्याच प्रयत्नात राज्यमंत्रिपदाची माळ पडली व सहकार आणि नागरी हवाई वाहतूक खात्यांचा कार्यभार ते सांभाळत आहेत. मात्र, साधेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या मोहोळ यांना मंत्रिपदामुळे सुरक्षा यंत्रणांकडून सतत मिळत असलेल्या शिष्टाचाराला सामोरे जावे लागत आहे. सुरक्षा जवानांकडून पदोपदी सॅल्यूट केला जात असल्याने अखेर बुधवारी मोहोळ यांनीच महाराष्ट्र सदनातील जवानांना सर्वप्रथम प्रेमळ शब्दांत सल्ला दिला.                  

महाराष्ट्र सदनात सॅल्यूट करणाऱ्या सुरक्षा जवानांना एकत्र बोलावून मोहोळ म्हणाले, ‘कोणताही सुरक्षा जवान अथवा अधिकारी यापुढे मला ‘जय हिंद’ करणार नाही. तुम्ही तुमची कर्तव्ये पार पाडायलाच हवीत. मात्र, मानसन्मान माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. महत्त्वाचे आहे ते कर्तव्य. यापुढे कोणीही मला ‘जय हिंद’ म्हणजे सॅल्यूट करण्यासाठी हात उंचावू नका. मला नमस्कार नाही केला, तरी चालेल.’

चार वर्षांत पहिल्यांदा अनुभवले...

मोहोळ यांच्या या वर्तनाने येथील सर्व सुरक्षा जवान भारावून गेले होते. त्यातील विकास वाघमारे या मराठी सुरक्षा जवानाने याबाबत त्याच्या भावना व्यक्त केल्या. ‘मी माझ्या चार वर्षांच्या वर्दीतील कर्तव्यावर पहिल्यांदाच हे अनुभवले. मंत्री असूनही इतका साधेपणा आणि सर्वांना समान वागणूक देण्याचा त्यांचा विचार खूप भावला,’ असे तो म्हणाला.

मी फार काही वेगळं केलंय असं मला वाटत नाही. कोणताही सुरक्षा जवान अथवा अधिकारी देशासाठी काम करत असतो. मीही देशासाठी काम करतो आहे. त्यामुळे त्यांच्यात आणि माझ्यात वेगळेपण नाही. म्हणून मला वाटतं, त्यांनी यापुढे मला ‘जय हिंद’ म्हणत सॅल्यूट करू नये. मानसन्मान माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. म्हणूनच कोणीही मला ‘जय हिंद’ म्हणजे सॅल्यूट करण्यासाठी हात उंचावू नका. मला नमस्कार नाही केला, तरी चालेल, असे मी त्यांना सांगितले आहे.

मुरलीधर मोहोळ
केंद्रीय राज्यमंत्री, सहकार व नागरी हवाई वाहतूक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News