जव्हार :-सोमनाथ टोकरे
जव्हार तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातल्या लहान मुलांमधील कुपोषण दूर करण्यासाठी, तसेच गरोदर व स्तनदा मातेच्या आहारात इतर अन्न घटकांसोबत रानभाज्यांचा समावेश प्रयत्नपूर्वक वाढायला हवा. यासाठी आरोहन व जे. एस. डब्ल्यु फाउंडेशनने राष्ट्रीय पोषण माहिना च्या निमित्ताने जव्हारमधील अंगणवाडीमध्ये रानभाज्या बद्दल माहिती देण्याचे काम चालू आहे. गुरुवारी लहान मेढा येथे रानभाज्या रेसिपी बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली. यात प्रभादेवी हिरा गांधी हायस्कूल, लहान मेढा या शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच गावातील गरोदर व स्तनदा मातांनी सहभाग घेतला. गावातील लोकांच्या आहारातून अनेक वर्षापासून दिसेनासे झालेल्या रानभाज्याची नव्याने ओळख करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला.
रानभाज्या कार्यक्रमामुळे घरातील व्यक्ती भल्या सकाळी उठून त्यांनी त्या भाज्या दरी-खोऱ्यातुन, डोंगरमाथ्यावरून शोधून आणल्या होत्या. या रानभाज्यांचे व पदार्थांचे प्रदर्शन या वेळी मांडण्यात आले होते. या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या रानभाज्यामधून ज्या महिलेची रेसिपी चांगली होती, अशा तीन महिलांना बक्षीस देण्यात आले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. यातून त्यांच्याकडे पिढीजात उपजत ज्ञान होतं मात्र त्याचं प्रतिबिंब त्यांच्या आहारात पुरेसं का नसतं? हा मुद्दाच अधोरेखित करण्यासाठी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमातून तेथे राहणाऱ्या आदिवासी लोकांनी निसर्गाशी पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. रानभाज्यांचे पोषणातील महत्व आदिवासी समुदायामध्ये पुन्हा निर्माण व्हावे. लहान मुलांमधील कुपोषण दूर करण्यातील एक महत्त्वाचा अन्नघटक म्हणून रानभाज्यांचे महत्व आहे. तसेच या रानभाज्यामुळे अनेक आजार बरे होतात. परंतु या रानभाज्या बनवण्याची पद्धत जर चुकली तर त्या भाज्याचे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. आपल्या परिसरातील रानभाज्या नष्ट होउन देऊ नका त्या जोपासा असे प्रतिपादन आरोहन संस्थेचे प्रकल्प अधिकारी कृष्णा बाजारे व माधुरी मुकणे यांनी केले.
पूर्ण सप्टेंबर महिन्यात विविध ठिकाणी रानभाज्याचे कार्यक्रम घेण्यात येत आहे. यातून रानभाज्याचे महत्व सांगण्याचे काम संस्थेचे सर्व प्रकल्प समुदाय संघटक करत आहे. यातून ते हे सांगत आहे कि, कुपोषण कमी करायचे असेल किवा कमी वजनाचे बालक जन्माला येवू द्यायचे नसेल तर रानभाज्यांचा रोजच्या आहारात समावेश करायला हवा. फक्त गरोदरपणातच नव्हे तर स्त्रियांना मासिक पाळी, गर्भपात, बाळंतपण अशा विविध शारीरिक टप्प्यांतून जावं लागतं, शिवाय घरकाम-शेतकाम, कुटुंबीय मुलांचं संगोपन या जबाबदाऱ्याही पार कराव्या लागतात. अशावेळी तिचं आरोग्य उत्तम राहणं आवश्यक आहेत त्यामुळं नेहमीच आपल्या जेवणात रानभाज्यांचा समावेश केला पाहिजे.
गावातील गरोदर मातेचे चांगले पोषण होण्यासाठी व सुदृढ बाळ जन्माला येण्यासाठी तिच्या आहारात सर्व पोषणमूल्य असावीत हे सर्व कार्यक्रमात सांगण्यात आले. हा कार्यक्रम आरोहन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नारकर व प्रकल्प व्यवस्थापक प्रदीप खैरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या कार्यक्रमाच्या वेळी कोगदा बीटच्या सर्व अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, पिलाने सर, भरसट सर, गावित मॅडम, संस्थेचे सर्व प्रकल्प समुदाय संघटक उपस्थित होते व यांचे उत्तम सहकार्य मिळाले.