पालम ः अनुसूचित जमाती (एस.टी) आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला असून 27 सप्टेंबर रोजी पालम येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, पालम शहरातून रॅली काढण्यात येणार असून त्याचे निवेदन सोमवारी (ता.25) पालम तहसिलदारांना सादर करण्यात आले.
अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर समाज 36 व्या क्रमांकाला आहे. तरीही भाषिक अपभ्रशांतून र आणि ड, असा भेद झाल्याने समाज आरक्षणापासून वंचित राहिला. म्हणून यशवंत सेनेच्या वतीने चौंडी (ता. जामखेड, जि.अहमदनगर) येथे उपोषण सुरू आहे. त्यास जाहीर पाठिंबा देत धनगर समाजास तातडीने एसटीच्या आरक्षणची अंमलबजावणी करून प्रमाणपत्र देण्यात यावे, समाजासाठी जाहीर केलेल्या 18 योजनांची अंमलबजावणी करून त्यास 1 हजार कोटींचा निधी द्यावा, धनगर आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून धनगर युवकास झालेल्या मारहाणीचा जाहीर निषेध सोमवारी दिलेल्या निवेदनात करण्यात आला. त्यासाठी पालम येथे 27 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता गंगाखेड ते लोहा, या राष्ट्रीय महामार्गावरील पालम येथील पेठपिंपळगाव चौकात रास्तारोको करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, श्री. खंडोबा मंदिर येथून आंदोलनाची रॅली काढण्यात येईल. ती. शनिवार बाजार, फळा रोडमार्गे पेठपिंपळगाव चौक येथे रास्तारोको करण्यात येणार आहे. निवेदनदेतेवेळी बाजार समितीचे सभापती गजानन रोकडे, सभापती डॉ. रामराव उंदरे पाटील, संचालक माऊली घोरपडे, श्यामराव काळे, माधवराव गिनगीने, माजी सभापती गणेशराव घोरपडे, दत्तराव देशमुख, गजानन देशमुख, भैय्या सिरस्कर, भगवान सिरस्कर, सरपंच बाळासाहेब ढोले, भास्कर लांडे, साधू हाके, भागवत बाजगीर, राजू वाघमारे, रंगनाथ कल्याणकर, गोविंद अव्हाड, गजानन भस्के, विजय गाणार, मंगेश घोरपडे यांच्यासह आदी उपस्थित होते.
पालमचे नायब तहसिलदारांना रास्तारोकोचे निवेदन देताना सभापती गजानन रोकडे, सभापती डॉ. रामराव उंदरे पाटील, संचालक माऊली घोरपडे, श्यामराव काळे, माधवराव गिनगीने, गणेशराव घोरपडे, दत्तराव देशमुख, गजानन देशमुख, भैय्या सिरस्कर, भगवान सिरस्कर, सरपंच बाळासाहेब ढोले, भास्कर लांडे, साधू हाके, भागवत बाजगीर आदी.