जव्हार :-सोमनाथ टोकरे
जव्हार ,दि. २९ जुलै जव्हार तालुक्यात गेल्या ३ दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र नदी नाल्यांना पूर येऊन बऱ्याच भागात पाणी साचले होते. जव्हार शहरालाही त्याचा फटका बसला जव्हार शहर हे उंचावर असून देखील जव्हार नगरपालिका क्षेत्रातील जांभुळवीर परिसरात एका ठेकेदाराने पाणी जाणाऱ्या नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बुजवून त्या ठिकाणी काँक्रीटचा रस्ता बांधला . नैसर्गिक पाण्याचा प्रवाह आडविल्यामुळे जांभुळवीर परिसरात शुक्रवारी घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले होते. त्यामुळे या भागातील रहिवासी भयभीत झाले होते. त्यांना दिलासा देण्यासाठी शुक्रवार दिनांक २८ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजता माननीय उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनीकांनी येथील रहिवाशांची भेट घेतली व पाणी शिरलेल्या घरातील लोकांना दिलासा देऊन त्यांची विचारपूस केली.या वेळी शिवसेना शहरप्रमुख परेश पटेल यांनी सांगितले की, पावसामुळे काही अडचण निर्माण झाली तर रात्री बेरात्री कधीही आम्हाला फोन करा. शिवसैनिक आपल्या मदतीसाठी येतील. या परिसरात हा रस्ता २ वर्षा पुर्वी करण्यात आला त्यामुळे येथील रहिवाशांना गेल्या दोन वर्षापासून पावसाळ्यात हा त्रास सहन करावा लागत आहे.मात्र या वर्षी पाऊस जास्त असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी घरात शिरले होते.त्यामुळे ह्या ठिकाणी पाणी जाण्यासाठी मार्ग करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली. त्यावेळी शिवसेने तर्फे आश्वासन देण्यात आले की, पाण्याचा मार्ग उघडा करण्यासाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मानीनी कांबळे यांची भेट घेऊन येथील परिस्थिती त्यांना सांगून तातडीने उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न करू. तसेच वेळप्रसंगी मोठे आंदोलन देखील उभारू असेही शिवसैनिकांतर्फे नागरिकांना सांगण्यात आले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख परेश पटेल, उपतालुकाप्रमुख आरशद कोतवाल, उपशहर प्रमुख आविन सावंत, अझर फरास , अमित आयरे, आसीफ घाची आदी शिवसैनिक उपस्थित होते.