जव्हार :-सोमनाथ टोकरे
वानगाव रेल्वे स्टेशन येथे सरकता जिना नसल्याने प्रवाशांना रेल्वे प्रवासासाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. वयोवृद्ध, विद्यार्थी, रुग्ण यांना रेल्वे पुल ओलांडताना कसरत करावी लागत होती. पावसाळ्यात या समस्येत अधिक भर पडत होती. त्यामुळे अनेक वर्षांपासून या स्थानकावर आधुनिक स्वयंचलित सरकत्या जिन्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. या मागणीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने वानगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी सरकता जिना उभारण्याचे काम केले. सदर जिना लोकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी खासदार श्री राजेंद्र गावित हे उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित असताना खासदार श्री राजेंद्र गावित यांनी स्थानिक प्रवाशांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणींची विचारपूस केली. रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत लोकांनी सुचवलेले बदल आपण लवकरच रेल्वे प्रशासनाला सांगणार असून योग्य ते बदल केले जातील अशी ग्वाही त्यांनी प्रवाशांना दिली.
लोकांच्या सेवेत दाखल झालेल्या या अत्याधुनिक सरकत्या जिन्यामुळे महिला, वयोवृद्ध, विद्यार्थी व रुग्ण यांना खूपच फायदा होणार असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. रेल्वे प्रशासनाने सदर जिन्याची योग्य ती देखभाल घेऊन प्रवाशांना काही अडचणी येणार नाहीत याची खबरदारी घेण्याची सूचना उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांना दिली.