जव्हार :-सोमनाथ टोकरे
पालघर जिल्हातील आदिवासी बहुल जव्हार तालुक्यातील आदिवासी भागात सर्वात पहिला येणार सण हा कोवळी भाजी चा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात ,नवीन पाण्याची नवीन मोड आणि पावसाळ्याची सुरवात याचा आनंद व्यक्त करण्यासाठी शेतकरी आपल्या पिकांची पेरण पूर्ण झाल्यावर व पाऊस पडल्यानंतर जंगलात सर्वात पहिली रानभाजी उगवते ती भाजी जंगलात जाऊन घेऊन येतात व गावातील गावदेवता ,निसर्ग देवता यांना गावातील पुजारी शेंदूर लावतात व देवाला विनवती करून मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. हा सण शक्यतो मंगळवार मोडा या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो.रविवार,सोमवार या दिवसी सकाळीच दिवसभरात महीला जंगलात कोवळी भाजी आणण्यासाठी जातात,पहील्या पावसाच्या सुरवातीला जे उगवते व जे प्रथम खाण्यास उपलब्ध होते अशी ही कोवळी भाजी निसर्गाने दिलेले वरदानच आहे.आणि त्याचा आनंद साजरा करण्यासाठी हा उत्सव साजरा करतात ही भाजी संध्याकाळी घरोघरी शिजवली जाते आणि ही भाजी शिजुन झाल्यानंतर लहाण मुले ,मोठी माणसे घरोघरी जाउन कोवळी भाजी घ्या अशा एक संदेश प्रत्येक माणसाला देत असतात.
पहिला पाऊस एकदोन वेळा पडून गेला की रानात शेवळी, देहगडी, चाईचे वेल, भुईफोड, कवळी भाजी,पेंडरा, लोती, करटोली अशा रानभाज्या रानात उगवतात. याच पार्श्वभूमीवर कवळी भाजीचा सण ग्रामीण आदिवासी भागात साजरा केला जातो. हा सण कॅलेंडरप्रमाणे एखाद्या विशिष्ट तिथीलाच येतो असे नाही. पाऊस पडल्यानंतर कवळी भाजी रानात उगवलीय का? हे पाहून गावातली माणसे कवळी भाजीचा एक वार निश्चित करतात. बहुधा मंगळवारी सण धरण्याचा प्रघात आहे. या सणाला नवीन लग्ने होऊन सासरी गेलेल्या पोरी आवर्जून माहेरी आणल्या जातात. रानातून भाजी आणली की त्यातली थोडीशी भाजी गावच्या गावदेवीजवळ ठेवली जाते. नंतर घरात शिजवली की घरातल्या करंडीत ठेवलेल्या कुलदैवतांना त्यातला थोडा निवद (नैवद्य) दाखवून मग लेकी बाळींसह सगळेजण जेवायला बसतात. कवळी भाजी ही बलवर्धक, रोगप्रतिकार शक्तीत वाढ करणारी, मेंदू सतेज ठेवणारी व स्त्रीयांच्या गर्भाशयातील विकार दूर करणारी आहे.असे जुनी जाणती माणसे म्हणतात. या सणाच्या दिवशी आदिवासी पाड्यावर संध्याकाळी माणसे कांबड नाच, तारपावाद्य, ढोलवाद्य, यांच्यावर नाचत. पोरं पोरी ,पुरूष- स्रिया अगदी म्हातारी माणसे अशी माणसेही ताल धरत.सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप उत्साह असायचा. पण आता गावात ढोल वाजत नाही अन तारपाही वाजत नाही. कारण ही वाद्य वाजवणारी माणसे आ लोप पावत चालली आहेत व नवीन पिढी ही वाद्य वाजवायला शिकत नाही. एखाद्या गावात बाहेरच्या गावचा वाजवणारा आणला तरी नवीन पोरांना नाचता येत नाही, असे चित्र ग्रामीण भागात बघायला मिळते.