जव्हार :-सोमनाथ टोकरे
जव्हार,दि. 19 शिवसेनेचा वर्धापन दिन जव्हारच्या आनंद दिघे चौकात आज दिनांक १९ जून २०२३ रोजी साजरा करण्यात आला. मराठी माणसावर होणाऱ्या अन्याय, अत्याचारा विरोधात शिवसेना या पक्षाची स्थापना हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली. आज जवळजवळ ५७ वर्ष शिवसेनेच्या स्थापनेला झाली असून हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक कामाची फळीच उभी केली होती. कुठेही अपघात झाला, रक्ताची गरज भासली, अन्याय झाला, माता भगिनींची कोणी छेड काढली अशा अनेक प्रसंगांमध्ये शिवसैनिक मदतीला धावून जात असतात अशा झुंजार शिवसेनेचा आज वर्धापन दिन असून हा वर्धापन दिन जव्हारच्या धर्मवीर आनंद दिघे चौकात पेढे वाटून साजरा करण्यात आला. यावेळी शिवसैनिक अनिल तामोरे यांच्या हस्ते भगव्या झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख श्रावण खरपडे, विक्रमगड विधानसभा समन्वयक विजय अंभिरे, शहर प्रमुख परेश पटेल, उपशहर प्रमुख साईनाथ नवले, अल्पसंख्यांक आघाडीचे शकील कुदमाळी आदि शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे ठामपणे उभे राहून विक्रमगड विधानसभेच्या गाव पाड्यावर घराघरात ,मनामनात शिवसेना पोहोचविण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला.