संचालकांना मारहाण, पाच जणांना पोलिस कोठडी
परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणूक कारणावरून आठ संचालक व इतर चार अशा बारा जणांना भीमानगर (ता. माढा) येथून पिस्तूल, कोयत्याचा धाक दाखवून लोखंडी रॉड, कुकरी व लाकडी दांडक्याने मारहाण करून बुधवारी सकाळी त्यांचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी त्वरीत दाखल गुन्हा होताच टेंभुर्णी पोलिसांनी गुन्ह्यातील या गांभीर्याची दखल घेऊन पाच संशयित आरोपींना अवघ्या चोवीस तासांत जेरबंद केले. या सर्व संशयितांना दुपारी
गुरुवारी माढा येथील वरिष्ठ स्तर न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी सोमवारपर्यंत (ता. २९) पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी सुरेश ऊर्फ सूर्यकांत कांबळे (वय ४९, रा. वरुड, ता. भूम), प्रदीप आजिनाथ पाडुळे (वय ३१, रा. कौडगाव, ता. परंडा), समाधान हनुमंत मिस्किन (वय २६, रा. डोमगाव, ता. परंडा), किरण ऊर्फ लादेन भीमराव बरकडे (वय ३१, रा. बुरुडवाडी, ता. भूम), जगदीश महादेव ठवरे- पाटील (वय २४, रा. कौडगाव, ता. परंडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.