चेतन ठाकरे सरांना राज्यस्तरीय "महाराष्ट्र रत्न गौरव" पुरस्कार जाहीर
जव्हार प्रतिनिधी :- सुनिल जाबर
अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाऊंडेशन या नामांकित संस्थेमार्फत "राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार"अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा माण,ता.विक्रमगड,जि.पालघर येथील माध्यमिक शिक्षक तसेच मोहो खुर्द गावचे सुपुत्र श्री.चेतन रमेश ठाकरे सरांना जाहीर झाला आहे.या अविष्कार फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.संजय पवार साहेबांनी चेतन सरांना निवड पत्र पाठवून तसेच फोन वर संपर्क साधून सरांचे कौतुक देखील केले.१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता जोतिबा रॉयल रिसॉर्ट,श्री.क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी)ता.पन्हाळा,जि.कोल्हापूर येथे अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करून सरांचा गौरव केला जाणार आहे.चेतन सरांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून अनेक क्षेत्रात त्यांचे भरीव कार्य असते.ते विद्यार्थीप्रिय,समाजप्रिय शिक्षक असून अनेक आदर्श विद्यार्थी त्यांनी घडविले आहेत.त्यांनी शैक्षणिक,सामाजिक,कृषी,क्रीडा, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी बजावली आहे.आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.प्रकल्प कार्यालय जव्हार,आश्रमशाळेच्या संस्थेचे पदाधिकारी,मुख्याध्यापक,शिक्षक वृंद,सर्व कर्मचारी,विद्यार्थी तसेच सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.