Type Here to Get Search Results !

मोखाडा | चारा, पाण्याच्या शोधात मोखाड्यातील जणावरांचे स्थलांतर



चारा, पाण्याच्या शोधात मोखाड्यातील जणावरांचे स्थलांतर ; ऊन्हाची तिव्रता वाढल्याने जनावरांच्या चारा, पाण्याच्या प्रश्न ऐरणीवर. 


मोखाडा प्रतिनिधी :सौरभ कामडी 


मोखाडा : रोजगाराच्या शोधात आदिवासी तालुक्यातील मजुर शहराकडे प्रतीवर्षी स्थलांतर करतात. आता चारा, पाण्यासाठी जनावरांचेही स्थलांतर सुरू झाले आहे. मोखाड्यातील सायदे - जोगलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील शेकडो जनावरांचे, चारा, पाण्यासाठी गुराख्यांसह नदीकाठी स्थलांतर झाले आहे. शासनाने मागणी प्रमाणे जनावरांना पाणी पुरवठा करणे सुरू केले आहे, मात्र, हिरवा चारा मिळत नसल्याने अखेर जनावरे आणि गुराखी नियमीत पावसाळा सुरू होईपर्यंत, म्हणजे तब्बल तीन महिण्यांसाठी स्थलांतरीत होऊ लागले आहेत. 


                 पालघर जिल्ह्यातील सर्वात भीषण पाणी टंचाई असलेला मोखाडा तालुका आहे. मोखाड्यातील टंचाई ग्रस्त गाव पाड्यांची संख्या 80 ते 100 च्या दरम्यान जाते. त्यांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. शासनाकडून केवळ नागरीकांनाच पाणी दिले जात होते. जनावरांनाही पाणी मिळावे म्हणून सकाळ ने अनेक वर्षे बातम्यांद्वारे पाठपुरावा केला होता. अखेर गतसालापासुन मोठ्या जनावरांना 35 ते 40 लीटर आणि लहान जनावरांना 15 ते 20 लीटर या प्रमाणात मोखाड्यात मागणी प्रमाणे, शासनाने टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला आहे.मात्र, हिरवा चारा जनावरांना मिळत नाही.                    


               त्यामुळे सायदे - जोगलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील शेकडो जनावरांना मिळणारा हिरवा चारा आणि पाणी यांचा श्रोत ऊन्हाची तिव्रता वाढल्याने आटला आहे. नदी, नाले आणि पानवठे कोरडे पडु लागले आहेत. त्यामुळे मार्च महिन्याच्या दुसर्या आठवड्यात गारगई नदीकाठी स्थलांतर केले आहे. या ठिकाणचा हिरवा चारा आणि पाणी संपल्यानंतर वाडा, वज्रेश्वरी भागात ही जनावरे स्थलांतरीत होतात. नियमीत पावसाळा सुरू होईपर्यंत त्यांचे स्थलांतर सुरूच असते. त्यानंतर आम्ही गावाकडे म्हणजे तीन महिण्यानंतर घरी परत येत असल्याचे चांगुणा हाडोंगा या गुराखी स्थलांतरीत वृध्द महिलेने सांगितले आहे. 


                सध्यस्धितीत, शासनाने दापटी 1, दापटी 2, स्वामीनगर, हेदवाडी, गवरचरीपाडा आणि ठाकुरवाडी या ठिकाणी नागरीकांसह जनावरांना ही टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केल्याची माहिती मोखाडा पंचायत समिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, टॅंकरचे पाणी विहीरीत टाकले जाते, हे पाणी काढून जनावरांना पिण्यासाठी द्यावे लागते, त्यातच जनावरे चार्याच्या शोधात सैरावैरा फिरत असल्याने त्यांना विहीरीतुन पाणी काढुन पाजणे शक्य होत नाही. तसेच जनावरांसाठी विहीरी व्यतिरीक्त हौद अथवा अन्य ठिकाणी पाणी साठवण्याची व्यवस्था नाही. मोखाड्यात 40 हजारांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामुळे जनावरे नदीकाठी नेऊन तेथेच वास्तव्य करत, त्यांना हिरवा चारा आणि पाणी देणे गुराख्यांनी पसंत केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad