कामाला सॅल्युट कराल तर जग तुम्हाला सॅल्युट करेल : गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी
शाळापुर्व तयारी मेळावा केंद्र पिंपळगाव (म) अंतर्गत प्रा.शा. दिग्रस येथे आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी हे उदघाटक म्हणून उपस्थित होते. त्याप्रसंगी शिक्षकांना कार्यप्रेरणा देण्याच्या उद्देशाने उदघाटन पर भाषणात म्हणाले, "कामाला सॅल्युट कराल तर जग तुम्हाला सॅल्युट करेल, जर तुम्ही कामाला सॅल्युट नाही केलात तर तुम्हाला जगाला सॅल्युट करावे लागेल."
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिग्रस येथे केंद्र प्रमुख विनोद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शाळा पुर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी केंद्रांतर्गत सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
इयत्ता पहिली प्रवेशासाठी यामेळाव्याच्या माध्यमातून गावातील साडेपाच ते सात वयोगटातील सर्व मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. त्याचे कृतीयुक्त प्रात्यक्षिक सर्व शिक्षकांना देण्यात आले. जेणेकरून शाळेवर गेल्यानंतर प्रत्येक गावात प्रभावीपणे शाळा प्रवेश सोहळा घेऊन १००% मुलांना शाळेत आणण्याचा उद्देश सफल होईल.
सौ.भोगे, सतिश पोफळे, विनोद भुसे, मुत्तेमवार व मुतनेपवाड आदी शिक्षकांनी मेळाव्याची तयारी करुन प्रात्यक्षिक सादर केले. दिग्रस शाळेचे मुख्याध्यापक राम देवणे व त्यांच्या संपूर्ण स्टॉफने या मेळाव्याचे उत्कृष्ट नियोजन केले होते.
या मेळाव्याचे उदघाटक म्हणून तालुका गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी मेळाव्याचे उदघाटन करुन शिक्षकांना संबोधित केले. विविध शासकीय योजना, उपक्रम त्यांची उपयुक्तता व अंमलबजावणी संदर्भात सुचना दिल्या. शिक्षकांना संबोधित करताना ते म्हणाले, "जे काही काम तुम्ही करता ते मनापासून आनंदाने केल्यास तुम्हाला त्यात आनंद मिळेल. त्या समाधानाने रात्री शांत झोप लागेल. तुमचे आजार कामाच्या तल्लिनतेने आपोआप दूर होतील. कामाची तल्लीनता हे एक प्रकारचे मेडिटेशन आहे. "
शाळांमध्ये आज स्पर्धा आहेत. तेव्हा जिल्हा परिषद शाळांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंदी ठेवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन केले.
या मेळाव्यासाठी केंद्रीय मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, राम देवणे, केंद्रांतर्गत पिंपळगाव, दाभड व दिग्रस येथील अंगणवाडी कार्यकर्त्या, अंतर्गत शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.