शेतात तारेच्या कंपाउंडमध्ये बांधलेल्या आठ बोकडांची चोरी करण्यात आली आहे. चोरट्याने ८० हजार रुपये किमतीच्या ८ बोकडे चोरून नेल्याची घटना शेटफळ परिसरात घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेटफळ येथील शेतकरी सिद्धेश्वर खडके यांच्या आपल्या शेतामध्ये शेळ्या आणि बोकड आहेत. त्यातील उस्मानाबाद जातीची सहा बोकडे, जमनापुरी जातीची पांढऱ्या रंगाची दोन बोकडे, अशी आठ बोकडे होती. २९ मार्च रोजी रात्री सर्व शेळ्या शेडमध्ये होत्या. ३० मार्च रोजी पहाटे खडके यांच्या चुलत भावाची मुलगी पूजा हिने घरी येऊन सांगितले की, तुम्ही पाळलेल्या शेडमधील शेळ्या शेतात फिरत आहेत. त्या बांधून ठेवा, त्यावेळी सिद्धेश्वर खडके यांनी जाऊन पाहिले असता कंपाउंडमधील काही भाग तुटलेल्या अवस्थेत होता. यावेळी शेडमधून आठ बोकड कमी दिसून आले. याप्रकरणी सिद्धेश्वर बलभीम खडके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास मोहोळ पोलिस करीत आहेत.