स्वतःच स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरीकडून परिसरात स्ट्रॉबेरी विक्री करतोय
सातपुड्यातील दुर्गम भागात स्ट्रॉबेरी विक्रीसाठी बाजारपेठ नसल्याने तोडणी योग्य झालेली स्ट्रॉबेरी विक्री करायची कशी असा मोठा प्रश्न स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरीपुढे निर्माण झाला होता. मात्र हतबल न होता स्वतःच स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरीकडून आजूबाजूच्या परिसरात स्ट्रॉबेरी विक्री करत असून रस्त्याने तसेच खेड्यापाड्यावरील ये-जा करणारे नागरिक थांबून स्ट्रॉबेरी खरेदी करतांना दिसून येत आहे.
धडगांव तालुक्यातील पाडली येथील शेतकरी रतिलाल गुलाब वळवी यांचे पाडली येथे शेत असून या शेतात असणाऱ्या एक एकर शेतात त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. सद्यःस्थितीत स्ट्रॉबेरी येण्यास सुरुवात झाली असून स्ट्रॉबेरी परिपक्व होऊन विक्री योग्य झाली आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी काढणी हे त्यांना क्रमप्राप्त झाले. परंतु स्ट्रॉबेरीसाठी बाजारपेठ नसल्याने स्ट्रॉबेरी तोडून विक्रीसाठी न्यायची कुठे असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी स्ट्रॉबेरी तोडून व्यवस्थित पॅकिंग करून परिसरातील लगतच्या गावांमध्ये तसेच मोटारसायकलीवर स्ट्रॉबेरीचे कॅरेट बांधून तळोदा तालुक्यातील खेड्यापाड्यावरील गावात स्वतःच स्ट्रॉबेरी विक्री करण्यास सुरुवात केली आहे. १४० ते १६० रुपये प्रति किलो या दराने ते स्ट्रॉबेरीची किरकोळ विक्री करत आहेत. रस्त्यावरुन प्रवास करणारे ग्राहक आवर्जून स्ट्रॉबेरीची खरेदी करतांना दिसून येत आहे.
स्ट्रॉबेरीसाठी योग्य बाजारपेठा नसल्याने शेतातील उत्पादित होणारा नाशवंत शेतमाल विकायचा कुठे या प्रश्नांवर पाडली येथील शेतकरी रतिलाल वळवी यांनी स्वतःच आजूबाजूच्या परिसरात स्ट्रॉबेरीची विक्री करून होणारे नुकसानच टाळले नाही तर थेट शेतमाल विक्रीचा अनोखे उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे.