Type Here to Get Search Results !

आदिवासी संस्कृती परंपरा शिमगा होळी सण.



आदिवासी संस्कृती परंपरा शिमगा होळी सण.


जव्हार - दिनेश आंबेकर.


आता जीवन जगण्याशी सणांची अर्थपुर्णता राहिली नाही. सण हे फक्त सेलिब्रेशन पुरतेच उरले आहेत. भारतीय भूमीवरच्या बऱ्याच सणांची पार्श्वभूमी पाहिली तर आदिवासी समूहांच्या सण साजरे करण्याच्या पद्धती व इतर बिगर आदिवासी समूहांच्या सण साजरे करण्याच्या पद्धती या मध्ये खूप मोठा फरक जाणवेल.




बिगर आदिवासी समूह हे कथा कहाण्या यांवर आधारित सण साजरे करतात. उदा. काही बिगर आदिवासी समूह होळीला होलिका दहन करतात. मात्र आदिवासी समूहांचे सण हे या देशातले ऋतू, हवामान, पिके यांच्याशी निगडित दिसतील.

फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला आदिवासींचा होळी हा सण असतो. फाल्गुन महिन्याच्या या पौर्णिमेनंतर आदिवासी बांधव शेतीसाठी रोप तयार करण्याची जागा निश्चित करून त्याठिकाणी पालापाचोळा झाडांच्या फांद्या, गवऱ्या जाळून आदोर, दाढ, डाही (राब) तयार करतात. (प्रदेश परत्वे वेगवेगळे शब्द असतील)


आदिवासी हा निसर्गाला देव मानणारा आहे.

निसर्ग आहे म्हणून आपण जगतो, ही श्रद्धेची भावना आदिवासी समाज निसर्गप्रति वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करतो म्हणूनच होळी पेटवली की प्रत्येक घरातून आणलेले होळीसाठीचे बोने (नैवद्य) होळीला अर्पण केले जाते. होळी हा शब्द ‘हाळी’ या शब्दापासून तयार झाला आहे.

हाळी देणे म्हणजे आवाज देणे, हाक मारणे.

आमच्या गावामध्ये होळी लावतांना अजूनही पुढील घोषणा दिल्या जातात. त्या अशा- एकजण पुढे म्हणतो… “यावली रे यावली. ” बाकीचे त्याला प्रतिसाद देतात ” ओ…” मग तो पुढे म्हणतो ” येशाल तर या, नायतर आम्ही होळी लावली रे…. “ असं म्हणून घरी राहिलेल्या सगळ्यांना होळी आता पेटणार आहे हे कळविण्याचा सदर घोषणांतून इशारा केला जातो. यानंतर ” नांदन रे नांदन” ओ..आमच्या होळीला सोन्याचे बंधन रे..

या घोषणा म्हणजे नुसत्या घोषणा दिल्या जात नाहीत तर या घोषणातून आदिवासी जीवनव्यवहाराची मूल्ये उद्घोषीत केली जातात. होळी लावण्यासाठी सगळ्यांची वाट पाहणे हे सामूहिक निर्णयाचे व समानतेचे मूल्य प्रतिबिंबित करणारे वर्तन आहे. तसेच सोन्याचे बंधन याचा अर्थ माणसांच्या, नियममर्यादांशी, नितीमत्तेशी येतो.


बंधन म्हणजे नियम, सोन्याचे बंधन याचा अर्थ खूप चांगले नियम. असे नियम मर्यादा जे चांगल्या समाजजीवनासाठी आवश्यक आहेत. असे नियम मर्यादा माणसे कोठल्याही लिखित कायद्याविना पाळतात.

होळीनंतर रंगपंचमीच्या आदल्या दिवशीपर्यं जो उत्सव सुरू असतो या संपूर्ण सणाला ” शिमगा” असे म्हणतात.

पौर्णिमेच्या आदल्या दिवशीची लहान होळी व पौर्णिमेच्या दिवशीची मोठी होळी झाल्यानंतर शिमगा सुरू होतो. त्याची समाप्ती रंगपंचमीच्या दिवशी होते. मोठ्या होळीनंतर रंगपंचमीच्या आदल्या दिवशीपर्यंत पेरण (सोंगे) घेऊन मुले, माणसे जवळच्या गावी फिरतात. या पेरणातून वेगवेगळ्या नकला करून, मुखवटे नाचवून लोकांचे मनोरंजन केले जाते. त्याच्या बदल्यात माणसे त्यांना तांदूळ, नागल्या असे धान्य किंवा अलीकडे पैसे दान करतात. हा आठवडेभराचा सण म्हणजेच शिमगा.


होळी या सणाला शेतीशी संबंधीतही पार्श्वभूमी आहे

ती अशी – झाडांचा वाळलेला पालापाचोळा, झाडांच्या वाळलेल्या फांद्या, गवऱ्या, गवत हे जाळून शेतीचे रोप तयार करण्यासाठीची जागा तयार करण्यासाठी प्रक्रिया म्हणजे राब जाळणे. भाताच्या रोप तयार करण्याच्या जागेला ‘आदोर’ म्हणतात तर नागलीच्या रोप तयार करण्याच्या जागेला ‘दाढ’ म्हणतात. हे आदोर किंवा दाढ भाजण्याचे काम पूर्वी होळीनंतर चालू होते होते. आतामात्र हा नियम कमी होत चालला आहे.


होळी नंतरच आंबा उसटला जातो म्हणजेच आंब्याच्या कैऱ्या खाल्या जातात कारण असं केल्याने सगळ्यांना आंब्याच्या कैऱ्यांचे जास्त नुकसान होत नाही. आता हाही नियम कोणी पाळतांना दिसत नाही. मुले माणसे आता होळीच्या आधीच कैऱ्या पाडत असल्याने त्याबरोबर परिपक्व नसलेल्या लहान लहानकैऱ्याही पडतात. त्यामुळे झाडावर फळधारणा कमी होते.


आदिवासी लोक कधीही होळीला एकमेकांना रंग लावत नव्हते.

फक्त रंगपंचमीलाच रंग खेळतात पण आता शहरी लोकांचे अनुकरण व्हायला लागले आहे. रंगपंचमी अगोदर फक्त तांब्याभरून पाणी अंगावर ओतून गंमत केली जात होती. तेही लहान होळी व मोठी होळी झाल्यानंतर धुळवडीच्या दिवशीपासून याची सुरुवात होते, ज्याला ‘धुलिवंदन’ (धूळवड) असे म्हणतात. हे झाल्यानंतर रंगपंचमी पर्यंत हा सण चालतो. हा जो उत्सव सुरू असतो त्याला ‘शिमगा’ असे म्हणतात.


पौर्णिमेच्या आदल्या दिवशीची लहान होळी व पौर्णिमेच्या दिवशीची मोठी होळी झाल्यानंतर रंगपंचमीच्या आदल्या दिवशीपर्यंत पेरण घेऊन मुले, माणसे जवळच्या गावी फिरतात. या पेरणातून वेगवेगळ्या नकलाकरून, मुखवटे नाचवून लोकांचे मनोरंजन केले जाते. त्याच्या बदल्यात माणसे त्यांना तांदूळ, नागल्या असे धान्य किंवा अलीकडे पैसे दान करतात. हा आठवडेभराचा सण म्हणजेच शिमगा.

शिमगा या सणाची समाप्ती रंगपंचमीच्या दिवशी होते.

रंगपंचमीला पूर्वी रानातल्या फुलांचे किंवा वनस्पतींचे रंग बनवून त्याने रंगपंचमी खेळली जात असे. यातून फुल व वनस्पतींचे औषधी गुण माणसाच्या अंगाला लागून शरीराचे आजार नाहीसे व्हावेत ही धारणा आहे. मात्र आता बाजारातून रंग आणून रंगपंचमी खेळली जाते. यातून अनेकांच्या डोळ्यात रंग जाऊन डोळे खराब झाल्याचेही प्रकार घडले आहेत.


आमच्या भागात रंगपंचमी या सणाला आजही काही जुनी माणसे वल्हवण असे म्हणतात. रंगपंचमीच्या दिवशीही होळी धगधगत असेल तर ती या दिवशी पाणी घालून विझवली जाते. आदिवासी ग्रामीण भाषेत वल्हवली जाते असे म्हणतात अन त्यानंतर रंगपंचमी खेळतात. ही रंगपंचमी खेळतांना रानातल्याच पानाफुलांचे रंग खेळले जात होते. पण आता सर्रास रासायनिक रंग वापरले जातात.


हा खरा आदिवासींचा सण. दिवाळी पेक्षाही हा मोठा सण.

पूर्वी शिमग्याच्या सणालाच घरातल्यांना नवीन कपडे घेतले जात, जत्रा भरत (अजूनही काही ठिकाणी भरतात). या जत्रेत अनेक घरगुती वस्तूंची खरेदी विक्री होत असे. म्हणून होळी हा आदिवासी समुदायांचा महत्वाचा सण आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad