पंढरपूर प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर भीक मागून आंदोलन
अपंगांना मिळणाऱ्या पेन्शन मध्ये पाचशे रुपयाची तुटपुंजी वाढ करून राज्य सरकारने आमच्या तोंडाला पानं पुसली आहेत. असा आरोप करीत आज प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालयासमोर भीक मागून आंदोलन करण्यात आले. या भीक मागून आंदोलनामधून मिळालेले पैसे शासनाला पाठवले जाणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा सचिव संजय जगताप यांनी दिलीय.
यावेळी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर हातामध्ये कटोरा घेऊन भीक मागण्यात आले. राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
चालू अर्थसंकल्पामध्ये अपंगांना प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन मिळावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. मात्र राज्य सरकारने पूर्वीच्या मिळणाऱ्या एक हजार रुपयांमध्ये फक्त पाचशे रुपयांची वाढ करून आमच्या तोंडाला पाणी पुसली आहेत.
मोठे मोठे पगार असणारे शासकीय कर्मचारी पेन्शन साठी रस्त्यावर उतरतात. सरकार त्यांच्यासमोर लोटांगण घालते. मग आम्ही अपंगांनी वाढत्या महागाईच्या काळामध्ये या तुटपुंजा पेन्शनवर जगायचे कसे? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात अपंग बांधव उपस्थित होते.