दृष्टीहीन दाम्पत्याचा घरासाठी टाहो, घरकुल मिळावे म्हणून सरपंचाचा उपोषणाचा इशारा.
वाखारी प्रतानिधी दादाजी हिरे
देवळा : 'अहो कुणी घर देता का घर' अशी आर्त अभिलाषा आपल्या दृष्टीहीन डोळ्यात घेऊन ऊन, वारा, पाऊस आणि गारपीट यांचा मुकाबला करत तब्बल सहा महिन्यांपासून उघड्यावर वास्तव्यास असलेल्या वृद्ध दाम्पत्याचा आक्रोश अजूनही मुर्दाड व्यवस्थेच्या कानावर जात नाही. यापेक्षा वेगळी शोकांतिका काय असू शकते ?
देवळा तालुक्यातील खामखेडा येथील आदिवासी वस्तीत वास्तव्यास असणाऱ्या ८५ वर्षीय दगा महारु जाधव आणि ८० वर्षीय बायजाबाई दगा जाधव हे वृद्ध दाम्पत्याचे संततधार पावसामुळे सहा महिन्यांपूर्वी मातीचे कौलारू घर कोसळले होते. अगोदरच कोणाचाही सहारा नाही. कसे-बसे आयुष्य जगत असतांना त्यात राहते घर जमीनदोस्त झाले त्यामुळे त्यांनी त्याच ठिकाणी उघड्यावर संसार थाटला.
प्रशासनाकडून तात्काळ घरकुल मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती मात्र सहा महिने उलटल्यानंतरही घरकुलाचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे कुणी घर देता का घर अशी म्हणण्याची वेळ वृद्ध दांपत्यावर आली आहे. सध्या अवकाळी पाऊस, गारपीट झाली. यात हे दाम्पत्य कसेतरी तग धरून वाचले परंतु भविष्यात मोठी नैसर्गिक आपत्ती आल्यास त्यांच्या जीवाचे काहीही बरे वाईट होऊ शकते. त्यामुळे त्यांना शबरी आवास घरकुल योजनेअंतर्गत तात्काळ घरकुल मंजूर करण्यात यावे व दृष्टीहीन दाम्पत्याच्या डोळ्यात पुन्हा जगण्याची उमेद निर्माण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आदिवासी दृष्टिहीन वृद्ध दाम्पत्याचे मातीचे कौलारू घर कोसळले होते. यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे मात्र प्रशासनाकडून अद्यापही घरकुलाचा लाभ दिला गेला नसल्याने त्यांचा निवाऱ्याचा प्रश्न सहा महिन्यांनंतरही तसाच आहे. तात्काळ वृद्ध दाम्पत्याला घरकुलाचा लाभ देऊन दिलासा द्यावा अन्यथा कळवण प्रकल्प कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच वैभव पवार यांनी निवेदनाद्वारे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा कळवण प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांना दिला आहे.