Type Here to Get Search Results !

एकता, समतेचे सूत्र सांगत सांस्कृतिक मुल्यांची पेरणी: भोंग-या हाट व आदिवासींची होळी ! संतोष पावरा, नंदुरबार

 



एकता, समतेचे सूत्र सांगत सांस्कृतिक मुल्यांची पेरणी: भोंग-या हाट व आदिवासींची होळी ! संतोष पावरा, नंदुरबार 

     


     "    कुर्रर्र...काय रा मेलो काय गावो 

         गावो उवीने गीते….

         बारा मोयनाम आवली उवी बाय 

         बारा मोयनाम आवे वो ssss 

         मेवू भोंग-यू लेती आवी उवी बाय 

         मेवू भोंग-यू लेती आवे वो sss   "





भावार्थ:- ( कुर्रर हा नाचतांना गातांना वापरला जाणारा  स्पुर्ती शब्द आहे. काय गाऊ , किती गाऊ  होळीची महिमा अपरंमपार आहे.  बारा महिन्यांनी आली होळीबाई. बारा महीन्यानी आली ! मेळा, भोंग-या सोबत घेवुन आली होळीबाई )





        सातपुडा परिसरातील  आदिवासींचा सर्वात महत्वाचा व मुख्य  सण  'होळी' समजला जातो. मध्य प्रदेश, महाराष्ट्र,  गुजरात आणि राजस्थान येथील आदिवासींच्या जीवनात होळी सणाला खुपच महत्वाचे  स्थान आहे. दुसरी गोष्ट अशी की, आदिवासींची होळी म्हणजे हिंदु संस्कृतीतली 'होलीका' नाही. आदिवासी निसर्गाच्या सान्निध्यात राहून  निसर्ग नियमांनी जगणारा समाज आहे. त्यामूळ आदिवासी संस्कृती,जन्म,  मरण, सण उत्सव हिंदुसारखे नाही. त्यांची स्वतंत्र जीवनशैली आहे. तसेच आदिवासी होळीचे देखील आपले स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख आहे. आदिवासींची होळी म्हणजे नुसते नाचणे गाणेही नाही तर सांस्कृतिक वैभव आणि लोकशाही जीवनमुल्यांनी भरलेला हा  सण आहे. श्रम, समूह, बंधूत, प्रेम, विश्वास, सहकार्य, श्रम अशी मानवी मुल्य आहेत. होळीच्या निमीत्ताने ही मानवी मुल्य आदिवासी जतन संवर्धन करत एका पिढीकडून दुस-या पीढीला सहज वाजत गाजत, नाचत  ही मुल्य सुपूर्त करत असतो. निसर्गातील नव चैतन्या बरोबरच आदिवासींच्या जीवनात उत्कटपणे उत्साहाने भारलेले नवचैतन्य होळीसोबत येत असते. गीत, पौराणिककथा, नृत्य, संगीत असे वेगवेगळ्या प्रकारेचे कलाविधी जीवन दर्शन भोंग-या होळीत  पाहायला मिळते. 





               आदिवासीची  पौराणिक लोक कथेत होळी, भोंग-या बाबत  आजही मौखिक स्वरुपात इतिहास सांगितला जातो. ज्यात होळी आणि दिवाळी ह्या दोन बहिणी असल्याचे सांगितले जाते. होळीचे दोन मुले म्हणजे भोंग-या आणि मेळादा असल्याचे या पौराणिक  लोक कथेत सांगितले आहे.त्या निमीत्ताने हे सण साजरी केले जातात.   

             होळी अगोदरच्या महिन्यात चांद दिसला की स्पुर्तीने कुर्रर अशी आरोळी देवून ढोल, मांदलवर थाप मारून  होळीचा 'दांडा' रोवला जातो. त्या महिन्याला आदिवासी 'दांडाचा महिना' म्हणतात. दांडा होळी  महिन्या पुर्वीच आदिवासी शेतातील सर्व कामे  आवरून घेतात. दांडा महिनानंतर एक महिन्याने होळी असते. होळीतील घुट , *बुरोगली  संपेपर्यंत कुठलाही लग्न-सण उत्सव साजरी केला जात नाही. घर बांधले जात नाही. होळीत नाचनारे बावा, बुद्या, गे-या,  राय, काली पाव्वी  ( होळीची आचार संहिता) नित्य नियमाने पाळतात. ज्यात होळीत नाचणारे गेर (नृत्य) करणारे खाटवर बसत नाही. बाईला सावली देखील अंगावर पडू देत  नाही. हे गेर बनणारे होळी येई पर्यंत गावाच्या बाहेर राहतात.  होळीचा दांडा रोवला की, परिसरात सर्वत्र होळीची तयारी सुरू होते. दररोज रात्री खळ्यावर ढोल-मांदल पावीचा सूर परिसरात निनादत असतो. सातपुडा परिसरातील आदिवासी   कुठल्याही कानाकोप-यात असेल दांडा नंतर तो होळीची आतुरतेनं वाट पाहत असतो. माथ-या पासून ते लहान मोठे सर्व होळीच्या चाहूलने पळस फुलांप्रमाने ऊत्साहाने फुलून जात असतो. चातक पक्षाप्रमाणे भोंग-या, होळी मेळादाची वाट पाहत असतो. 






            होळी अगोदर येणारा आठवडे बाजार हाट म्हणजे 'भोंग-या हाट' मध्य प्रदेशातील खेतिया, पानसेमल, बडवानी, झाबुआ, अलिराजपुर तर महाराष्ट्रातील धडगांव, तोरणमाळ, फलाई, म्हसावद गुजरात राज्यातील कवाठ, पावी जेतपूर, झाब, तेलवमाता तसेच राजस्थान परिसरातील काही क्षेत्रांत अनेक ठिकाणचे भोंग-या हाट प्रसिद्ध आहेत.  ज्यात परिसरातील आदिवासी ढोल, मांदल, घेवून मोठ्या संख्येने एकत्र येतात. होळीला लागणारे सर्व सामान भोंग-यात खरिदी करतात. भोंग-या हाटात सगेसंबधीना आपापल्या गावातील होळीचा नेवता (निमंत्रण) देतात. ब-याच महिन्यात भोंग-या निमित्ताने आदिवासी एकमेकांना आपासात भेटतात त्यामूळे खुशीत पान खावू खालतात. एकमेकांनासोबत आपले  सुख दुख व्यक्त करतात. भोंग-या हाट बाबत संतोष पावरा यांच्या ढोल काव्यसंग्रहातील आदिवासी पावरी भाषेतील 'भोंग-यू ' कवितेत भोंग-याचे वर्णन- 

   "  गुलाल्यामा गुलाल उडाव्या 

      इन आट मा नाचणे आव्यू आमू भोंग-यू 

      आटवावा आट कोरताह

      ढूलो वाला ढुल वाजताह 

      मेवू फि-यू 

     पटिल , कारभारी, ढायला ,पु-या  

     बोठा नाचणे आव्या भोंग-यू   "

(भावार्थ:-  गुलाल्यात  गुलाल उदळवून  होळीचा संदेश देत भोंग-या हाट ला सुरूवात होत असते. भोंग-या बाजारात आलो आम्ही  ढोल , पावी, मांदळ घेवून. लोकं होळीचा बाजार करत आहेत. ढोल वाजत आहे. वाजत गाजत मेळा (मिरवणुक ) फिरत आहे. आसपासच्या गावातील पाटिल, कारभारी आले आहेत. माथारे,  तरुण-तरुणी सर्वच येतात. समतेने, एकतेने  एकत्र नाचतात. गातात. नाचत गात जीवन मुल्ये जपतात. जीवनाचे खरे तत्वज्ञान जगाला समजवून जातात

             भोंग-या हाट मध्ये हाट बरोबर ढोल, मांदळ घेवून बारा एकच्या सुमारस सर्व जमा होतात आणि वाजत गाजत मोठी मिरवणुक काढली जाते. या मिरवणुकला देखील खुपच  महत्व आहे. या मिरवणुकीला 'मेवू '(मेळा) असे म्हणतात.  आसपासच्या परिसरातील शंबर डीढशे  हून अधिक ढोल असतात. परंतू भोंग-या हाटच्या मेळ्यात  प्रथम फिरण्याचा मान विषेश रुतबा, मान असलेल्या गावालाच असतो. बाकी त्यांच्या मागे असतात.  त्या गावातील कारबारी, पाटिल पंच आपल्या पारंपरिक पेहरावात वाद्य, नृत्य सोबत असतात. हातात पारंपरिक शस्र आणि फळस फुलांचा गुच्छा, जांबळाची लहान लहान फांदी देखील मेळात घेवून लोकं नाचतात. 

         दोन तीन वर्षापुर्वीची घटना आहे. आमच्या लक्कडकोट गावाचा मेलाळा  परंपरेनुसार  म्हसावद भोंग-यातील मिरवणुकीत प्रथम मान  असतो. एकदा म्हसावद भोंग-याला आम्ही  गेलो. सोबत पाटील, कारबारी, गेर होती. मी देखील गेर सोबत होतो. बासरी वाजण्यात दंग! बारा वाजले होते. तो पर्यंत एका मैदानात सर्व ढोल जमत होते. बघता बघता आमच्या गावाजवळील चिरडे गावातील लोकांनी आपली वाद्य घेवून मेळ्याला सुरुवात केले. आमच्या गावतील लोकांच्या कानी ' चिरडे गावतील लोकं मेळा फिरवत असल्याचे  एकू आले आणि सर्व कावरे बावरे होवुन त्यांच्याकडे हत्यार घेवून धावू लागले. पण लागलीच पोलीस आले; समजुत काढली  नाहितर मोठा वाद झाला असता. 

         काही  शहरी लोकं, अभ्यासक आणि प्रचार प्रसार माध्यमांनी भोंग-या हाटला भोंग-या पर्व, प्रणयपर्व  अशा शब्दप्रयोग करून भोंग-याकडे बगण्याचा दुषीत प्रतिमा तयार करत आहेत. भोंग-या हाट  म्हणजे आदिवासींचा 'वेलेंटाईनडे', एखाद्या तरुणाला ऐखादी तरुणी  आवडली आणि गुलाल लावला तर ती राजी होते, भोंग-यात कसेही मुलीची  षेडछाड करता येते अशी अफवा पसरवत भोंग-या हाटला बदनाम केले जाते,  तर हे सर्व चुकीचे आहे. आदिवासीच्या सांस्कृतिक जीवनाला बदनाम केले जात आहे. अशा कृत्याला  होळी मेळादात मज्जाव नाही हे आधीच मांडले आहे. कारण भोंग-यात सर्व लोकं आपापली पारंपरिक हत्यारं घेऊन येत असतात अशात कुणी आडवे आले, ऐखाद्या मुलीला वाईट भावनेने  बघीतलं तर त्याची खैर राहणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे.  दुसरी गोष्ट आधी म्हटल्याप्रमाणे होळीचा दांडा रोवला तेथुन आदिवासी होळी नंतरचे पाच दिवस आणि घुट  , बुरोगली संपेपर्यंत लग्न, साखरपुडा  करत नाही. लग्नजोड़नी( साखरपुडा) करत नाही  आणि घर देखिल बांधत  नाही तेथे गुलाल लावून मुलगा मुलगी लग्न करतात  असा प्रश्नच निर्माण होत नाही. अशा दुषप्रचारमुळे आदिवासींच्या  मुल्याचे नुकसान होत आहे. मानवी मुल्यांना तडा जातो. आदिवासी संस्कृतीचे -हास होते आणि आदिवासी संस्कृतीची -हास होने म्हणजे प्रकृति पर्यावरणचा देखील -हास होतो.  कारण निसर्ग जतन संवर्धन करणारी जगातील एकमेव अशी आदिवासी संस्कृती आहे याची नक्किच जाणीव असली पाहिजे. जसे आदिवासींच्या जीवनातील हसत खेळत शिक्षणकेंद्र असलेले  'घोटूल' ला शहरी लोकांनी (अभ्यासकांनी)  व्यभिचाराचे केंद्र म्हणून पाहत आदिवासी शिक्षण व्यवस्था बदनाम करत आहे. तसे भोंग-या हाटला भोंग-या पर्व म्हणूण भोंग-या हाट बदनाम करू नये! भोंग-या नीट समजावून घ्या. आदिवासी जाणकारांना नीट विचारा कुठली मुल्य दडलेली आहेत याचे शोध घ्या तेव्हाच भोंग-या बाबत बोला ! आदिवासी संस्कृती वाचवा निसर्ग वाचेल. तेव्हाच  मानवीमुल्यांचे जतन संवर्धन होईल!  -संतोष पावरा

   (युवा कवी साहित्यिक) असे आवाहन केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad