जव्हार तालुक्यातील रस्त्याच्या कामांच्या स्थगितीमुळे विकास रखडला
जव्हार प्रतिनिधी :- सुनिल जाबर
जव्हार तालुका हा आदिवासी बहुल दुर्गम तालुका असून स्वातंत्र्याची ७५ वर्ष होवून देखील हा भाग विकासापासून वंचित राहिला आहे .आजही दुर्गम भागात जाण्यासाठी रस्ते नाहीत ,दोन रस्त्यांना जोडणारे लहान पुल नाहीत रस्त्या अभावी अनेक सर्पदंश व डिलिव्हरी रुग्ण रुग्णालयामध्ये पोहचू न शकल्यामुळे दर वर्षी दगावतात .त्यातच या भागात प्रचंड प्रमाणात पावसाचे प्रमाण असल्याने रस्त्याची दुरवस्था होत असते .असे असताना मागील एक वर्षापासून ५०५४ मार्ग व पुल यावरील भांडवली खर्च ०३,०४ राज्यमार्ग या शीर्षकाखाली सन २०२२ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांवर स्थगिती आहे .
सदर कामे ही महविकास आघाडीच्या काळात मंजूर करण्यात आली होती मात्र सत्ता बदलल्यानंतर आलेल्या शिंदे सरकारने सदर कामांवर स्थगिती आणली आहे .वास्तविक पाहिलं तर ही कामे झाली असती तर बऱ्यापैकी गावपाड्यामध्ये रस्ते झाले असते तर बरेच गाव पाडे शहराला जोडले गेले असते .वाहतूची सोय होवून रुग्णांना देखील शहराच्या ठिकाणी वेळेत रुग्णालयात पोहचता आले असते .खेड्यापाड्यातील विद्यार्थि वर्गाची पायपीट थांबली असती मात्र शिंदे सरकारने या कामावर स्थगिती आणून आदिवासी ग्रामीण भागाचा विकास थांबवला आहे .विशेष म्हणजे जव्हार तालुक्यातील वावर वांगणी भागात सन १९९२ - ९३ सालात कुपोषणामुळे शेकडो बालके मृत्युमुखी पडली होती.त्यावेळेस सरकारचे लक्ष या भागाकडे गेले व आदिवासी भागाला मूलभूत सोयी सुविधा पोहोचविण्याच्या दृष्टीने सुरुवात झाली होती मात्र आता या भागात साधं बोलायला रेंग सुद्धा मिळत नाही परत या भागात विकास रखडला आहे . महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना जव्हार तालुक्याची परिपूर्ण माहिती आहे असे असताना विकास कामांवर टाकलेली स्थगिती तातडीने उठवावी अशी मागणी ग्रामीण जनता करीत आहे.