Type Here to Get Search Results !

आरोग्य विभागाच्या महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे विजेते घोषित



आरोग्य विभागाच्या महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे विजेते घोषित

आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार - आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत



                इंडिया न्युज प्रतिनीधी



पुणे दि १७:-सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी व्रत घेतल्यासारखे काम करत असून, जनतेच्या जास्तीत जास्त सहभागाद्वारे आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार, असा विश्वास आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला.


सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित महाआरोग्य फिल्म फेस्टिवल २०२२-२३ आणि पारितोषिक वितरण आरोग्य मंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, उपसंचालक डॉ.कैलास बाविस्कर, जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने डॉ. केतन खाडे, जेएसआयच्या डॉ. वैशाली बिऱ्हाडे, डॉ. तृप्ती शिंदे, परीक्षक म्हणून काम केलेले स्मिता वैद्यनाथन, विश्राम ढोले, डॉ. वैजयंती पटवर्धन उपस्थित होते.


डॉ. सावंत म्हणाले, महाराष्ट्राला अधिक सुदृढ व निरोगी बनविण्यासाठी आरोग्य कार्ड बनविले जाईल. गेल्या सहा महिन्यात सरकारने आरोग्य क्षेत्रात अनेक नवनवीन योजना राबविल्या आहेत. 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. जागरूक पालक, सदृढ बालक या नव्याने सुरू झालेल्या योजनेलाही चांगला प्रतिसाद लाभत आहे. राज्यातील सर्व बालके सदृढ आणि निरोगी असावीत असा संकल्प आरोग्य विभागाने केला आहे. 


आयुक्त धीरज कुमार यांनी जनतेपर्यंत आरोग्य योजना पोहोचविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले. 


ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे म्हणाले, या महाआरोग्य फिल्म फेस्टिवलमधून अनेक लपलेले दिग्दर्शक पुढे येतील. चित्रपटांकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून न बघता आरोग्य शिक्षणासाठी त्याचा प्रभावी माध्यम म्हणून वापर करता येतो. आरोग्य विभागाने ते दाखवून दिले आहे. 


राज्यभरातून महाआरोग्य फिल्म फेस्टिवलसाठी प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. एकूण १५५ प्रवेशिका राज्यभरातून प्राप्त झाल्या. त्यापैकी ११८ प्रवेशिका आरोग्य विषयाशी निगडीत होत्या. ८ परीक्षकांमार्फत परीक्षण करून गुणांकन करण्यात आले. यापैकी ५ टीव्ही स्पॉट, ५ माहितीपट असे एकूण १० विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. दोन्ही गटातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यास २० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास १५ हजार, तृतीय क्रमांकास १० हजार रुपये, तर चौथा क्रमांक पटकावणाऱ्या दोन विजेत्यांना प्रत्येकी अडीच हजार रुपये रोख बक्षीस म्हणून देण्यात आले. उर्वरित ९८ सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात आली. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी केले. 


महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे विजेते:

लघुपट/माहितीपट गट: रोहन शाह (प्रथम, साखरेपेक्षा गोड), अनुपम बर्वे (द्वितीय, गोष्ट अर्जुनाची), प्रवीण अजिनाथ खाडे (तृतीय, ताजमहाल), आर के मोशन पिक्चर (चतुर्थ, फॉरएवर), रायबा अंजली (चतुर्थ, बबाते)


टीव्ही स्पॉट:राहुल सोनावणे (प्रथम, अडाणी), शैलेंद्र गायकवाड (द्वितीय, टीबी हारेगा देश जितेगा), लोकेश तामगिरे (तृतीय, साल्ट रिडक्शन शोले), निखील राहुल भडकुंबे (चतुर्थ, शेतकरी), सय्यद बबलू (चतुर्थ, एंड ऑफ लाईफ).


सार्वजनिक आरोग्य विभागाकडून २०२० पासून लोकसहभागाने व भागीदारीने आरोग्य शिक्षण या संकल्पनेतून महाआरोग्य फिल्म फेस्टिवल या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. आरोग्य विषयक जनजागृतीसाठी लोकांचे योगदान वाढावे, तसेच चित्रपट निर्माते, निर्मिती कंपन्या, सार्वजनिक संस्था, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी व चित्रपट क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी आरोग्य या विषयावर लघुपट तयार करण्यासाठी संधी याद्वारे उपलब्ध करून दिली आहे. 


        प्रतिनीधी:-अभिषेक जाधव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News