जव्हार वासियांना बिबट्याचे दर्शन.
सोनार आळीत एकच खळबळ.. !! बिबट्या आला रे, आला.. !! भुंकणाऱ्या कुञ्यांनी बिबट्याला रोखले, मानवी वस्तीत येण्यास मज्जाव.. !!
जव्हार प्रतिनिधी :- सुनिल जाबर
पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका म्हणून जव्हार तालुक्याची ओळख आहे. निसर्ग सृष्टीने नटलेल्या जव्हार तालुक्यात आजही जंगलात वन्यजीव सृष्टीचा वावर पाहावयास मिळतो. जव्हार शहरातील सोनार आळीत असलेल्या दरी मध्ये,आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास जव्हार वासियांना बिबट्याचे (Leopard) दर्शन झाले.
सोनार आळीच्या दरीत दाट झाडी झुडपांमधुन पहाटेच्या सुमारास बिबट्या आल्याची चाहूल भुंकणाऱ्या कुञ्यांना आली. एकाएकी अचानक पहाटे कुञी भुंकू लागल्याने परिसरातील लोकांनी कुञी का भुकत आहेत. याचे निरीक्षण केले असता सोनार आळीतील दरीत बिबट्या असल्याचे परिसरातील रहिवाशांना दिसले.
वन्यप्राणी खाद्याच्या शोधात भुकेपोटी सावटाच्या शोधात मानवी वस्तीच्या भोवती आसपास आता फिरकु लागल्याने जव्हार शहरात घबराट पसरली आहे. मानवी वस्तीत कुञ्याच्या वासाने बिबट्या मानवी वस्तीकडे वाटचाल करत आहे.
माञ कुञ्यांच्या भुंकण्याने बिबट्याला जव्हार शहरात मानवी वस्तीत शिरकाव करण्यापासुन रोखल्याची घटना सोनार आळीत घडली आहे. सर्व कुञी बिबट्याच्या दिशेने भुंकू लागल्याने मानवी वस्तीजवळ आलेल्या बिबट्याने अखेर जंगलाकडे पळ काढला.
“मंगळवारी पहाटे कुञी भुंकू लागल्याने सोनार आळीतील दरीत बिबट्या आल्याचे दिसले.त्यामुळे नागरिकांमध्ये,घबराट पसरली होती.” – महेश उदावंत, सोनार आळी रहिवासी, ता. जव्हार, जि. पालघर