रांझणी कृषि विद्यालयात बोर्डो पेस्ट विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
तळोदा तालुक्यातील रांझणी येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषि तंत्र विद्यालयात विद्यार्थ्यांना बोर्डो पेस्ट व बोर्डो मिश्रणाविषयी प्राचार्य प्रविण वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली विषय शिक्षक जिजाबराव पवार यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह विद्यार्थ्यांना झाडांना बोर्डो पेस्ट लावण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कळीचा चुना, मोरचूद व पाण्याच्या योग्य प्रमाणातील मिश्रणाला बोर्डो पेस्ट असे म्हणतात. हे मिश्रण प्रभावी बुरशीनाशक असून वेगवेगळ्या तीव्रतेच्या बोर्डो मिश्रणाचा फवारणी व झाडाच्या बुंध्याला लावण्याकरिता वापर केला जातो. झाडांची छाटणी केल्यानंतर फांद्या कापलेल्या ठिकाणी झालेल्या जखमेवर बोर्डो पेस्ट लावल्यास रोगाचे विषाणू झाडामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. फळबागेचे रोगांपासून रक्षण करण्याकरिता प्रतिबंधक उपाय म्हणून वर्षातून कमीत कमी दोन वेळा म्हणजेच उन्हाळा सुरु झाल्यावर आणि पावसाळा संपल्यानंतर फळझाडांच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट लावणे आवश्यक असते. पावसाळा सुरु झाल्यावर बोर्डो पेस्ट पावसाच्या पाण्यामध्ये विरघळून झाडाच्या बुंध्याशी गेल्याने झाडाच्या मूळाशी असलेल्या रोगकारक बुरशीचा नाश होतो.
बोर्डो पेस्ट तयार करण्यासाठी चांगल्या प्रतीचे मोरचूद आणि उच्च प्रतीचा हवाबंद डब्यातील चुना घ्यावा. बोर्डो पेस्टमध्ये एक किलो मोरचूद, एक कि.ग्रॅ.कळीचा चुना आणि दहा लिटर पाणी वापरावे. १ किलो स्वच्छ मोरचूद पूड व १ किलो कळीचा चुना प्लॅस्टिकच्या वेगवेगळ्या बादलीत किंवा मडक्यात ५-५ लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालावे. चुना व मोरचूदचे दुसऱ्या दिवशी अन्य बादलीत मिश्रण करावे. मिश्रण करीत असतांना द्रावण काठीने सतत ढवळावे. तयार झालेले घट्ट द्रावण म्हणजेच बोर्डो पेस्ट होय. याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य प्रविण वसावे, प्रा.शरद साठे, भिक्कन पाटील, जिजाबराव पवार, राजेश पाडवी, दिपक मराठे, जितेंद्र वानखेडे आदींसह विद्यार्थी व विद्यार्थींनी उपस्थित होते.