ग्रामपंचायत पेसा सदस्यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न.
जव्हार - दिनेश आंबेकर.
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत पेसा प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रम महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यशदा पुणे प्रस्तावित गोखले एज्युकेशन सोसायटीचे पंचायत राज प्रशिक्षण केंद्र कोसबाड व जिल्हा परिषद पालघर व पंचायत समिती जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत पेसा सदस्य यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण दिनांक २०फेब्रुवारी ते २२फेब्रुवारी २०२३रोजी प्रगती प्रतिष्ठान जव्हार येथे आयोजित करण्यात आले.
सदर प्रशिक्षण उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती जव्हार च्या सभापती विजयाताई लाहरे उपस्थित होत्या त्याच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी सभापती विजयाताई लाहरे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना सदर प्रशिक्षण हे खूप महत्त्वाचे असून सर्व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी पेसा कायदा, वन हक्क कायदा तसेच आदिवासींसाठी असणारे विविध कायद्यांची माहिती घेऊन आपल्या गावासाठी काम करत असताना आपल्याला येणाऱ्या अडचणी याविषयी आपण जागृत राहिले पाहिजे तरच आपण आपल्या गावाचा विकास करू शकतो असे यावेळी सांगितले.
प्रशिक्षण मध्ये तज्ञ मार्गदर्शक विजय आंबात, मनोज कामडी, विजय पाटील, विठ्ठल गावीत, तालूका पेसा समन्वयक आशा शिंदे यांनी तीन दिवसांत पंचायत क्षेत्र विस्तार कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी, अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा व तिचे विशेष अधिकार, ग्रामसभा कोष निधीचे व्यवस्थापन, आदिवासी विकासासाठी विविध शासकीय विभागाच्या योजना व अंमलबजावणीची सद्यस्थिती, वन हक्क कायदा अंमलबजावणी व सद्यस्थिती, सामूहिक वन हक्क कायदा, महाराष्ट्रातील आदिवासी समाजाची ओळख,आदर्श गाव संकल्पना, स्थानिक विकासाचे नियोजन व ग्रामसभा व पंचायतराज संस्थांची भूमिका इत्यादी विषयांवर सखोल असे उदाहरणासह मार्गदर्शन केले.