रांझणी कृषि विद्यालयात विद्यार्थ्यांना गांडूळ खताबाबत मार्गदर्शन
तळोदा तालुक्यातील रांझणी येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषि तंत्र विद्यालयातील विद्यार्थ्यांना गांडूळ खताबाबत प्रा.शरद साठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सध्याच्या काळात रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त होत असल्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकांवर तसेच जमिनीवर दिसून येतो. पूर्वी शेतकरी शेणखत, कंपोस्ट खत, गाळाचे खत तसेच पिकांची फेरपालट यांचेद्वारे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवत असे जमिनीचा सुपीक थर होण्यासाठी गांडूळ महत्त्वाचे कार्य करते. गांडुळाच्या शरीरामध्ये प्रोटोलिटिक, सेल्युलो लाटकीक आणि लीग्नो लायटिक एंझाईम असतात. गांडूळ खतामध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये एकत्रित उपलब्ध असतात.
गांडूळ खत दोन पद्धतीने तयार करता येते, टाकी पध्दत आणि दुसरी खड्डा पद्धत. दोन्ही पद्धतीमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे. सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छपराचे शेड तयार करावे लागते.
यात खड्डा पद्धतीने गांडूळ खत तयार करण्यासाठी छपराच्या अथवा झाडांच्या दाट सावलीत खड्डे तयार करावेत. खड्ड्याची लांबी तीन मीटर, रुंदी दोन मीटर आणि खोली ६० सेंटिमीटर ठेवावी. खड्ड्याच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस व गव्हाचा कोंडा तीन ते पाच सेंटीमीटर जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा.
दोन्ही थर पाण्याने पूर्ण ओले करून त्यावर साधारणतः १०० किलोग्राम सेंद्रीय पदार्थापासून गांडूळ खत तयार करण्यासाठी गांडुळे सोडावी. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत जास्त ५० सेंटिमीटर जाडीचा थर रचावा. त्यावर गोणपाटाच्या आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे. गांडुळाच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थामध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे थर घट्ट झाल्यास हाताने सैल करावे. त्यामुळे खड्ड्यातील तापमान नियंत्रित राहील. अशाप्रकारे झालेल्या गांडूळ खताचा ढीग करावा. ढीगातील वरच्या भागातील खत वेगळे करून सावलीत वाळवून चाळुन घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडुळे त्यांची पिल्ले व अंडकोष यांचा पुन्हा गांडूळ खत तयार करण्यासाठी वापर करावा.
गांडूळ खताचे फायदे गांडूळ खतामधील अन्नद्रव्ये पिकाला आवश्यक अशा स्वरूपात उपलब्ध असतात. गांडूळ मधील सूक्ष्म जीवांमुळे रोगनिर्माण करणाऱ्या सूक्ष्म जीवांचा नाश होतो. पिकावर येणारी रोगराई कमी होते. त्यामुळे कीटकनाशकांचा खर्च कमी होतो. गांडूळ खतामुळे पाण्याचा योग्य निचरा होतो व जमिनीची जलधारण क्षमता वाढते. गांडूळ खताची रचना कणीदार असते त्यामुळे ते मातीचे कण धरून ठेवते व वाऱ्यामुळे, पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप कमी होत असते याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य प्रविण वसावे, प्रा.शरद साठे, भिक्कन पाटील, जिजाबराव पवार, राजेश पाडवी, दिपक मराठे, जितेंद्र वानखेडे आदींसह विद्यार्थी व विद्यार्थींनी उपस्थित होते.