शुभप्रसंगी संबळाच्या तालावर नाचतात वीर
तळोदा: सध्या सर्वत्र लग्नासराई ,गोंधळ, जाऊळ यासारखे शुभकार्य सुरू असल्याचे चित्र असून त्यानिमित्त शुभकार्याच्या ठिकाणी देव आणतांना वीर काढण्याची प्रथा आजही सुरू असल्याचे चित्र असून वीरांची मिरवणुकीवेळी मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान आपला परिवार, घरात समृद्धी नांदावी यासाठी वीर नाचविण्याची प्रथा आजही सुरू असून लग्न, गोंधळ जाऊळ तसेच अक्षयतृतीयेच्या दुसऱ्या दिवशी वीर काढण्यात येतात. यावेळी वीरांना धोतर नेसवण्यात येऊन शरीरावर रंगीत पातळ गुंडाळण्यात येऊन डोक्यावर फेटा बांधण्यात येत असतो,हातात तलवार तसेच पायात घुंगरू अशी त्यांची सजावट करण्यात येते .त्यानंतर संबळाच्या तालावर वीरांची मिरवणूक काढण्यात येऊ संबळाच्या तालावर वीर नाचत असतात . यावेळी वीरांचे औक्षण करण्यात येऊन कुटुंबातील सर्व सदस्य वीरांची विधिवत पूजा करत असतात.
ग्रामीण भागात वीर काढण्याच्या प्रथेला आजही अनन्यसाधारण महत्व असून वीरांना सजवण्यासाठी गावातील जेष्ठांना पाचारण करण्यात येत असते. तसेच वीर बनण्यासाठी युवकांमध्येही स्पर्धा लागलेली असल्याचे दिसून येत असते.