सावऱ्यादिगरला पूल सुचवला,तो 18 वर्षानंतर ही पूर्ण झाला नाही! त्या निर्णयाचा आता मला पश्चाताप होतोय. असे उद्विग्न उदगार काढले मा.सतीश भिंगारे,(सावऱ्या दिगर टापू परिसर समितीचे अध्यक्ष)यांनी!
सावऱ्या दिगर व परिसरातील, सादरी,भमाणे, उडद्या,भादल ही गावे सरदार सरोवर मुळे संपर्क क्षेत्राच्या बाहेर जातात.येथील लोकांची मागणी होती की पाणी वाढल्यामुळे मगरींपासून मनुष्य व पाळीव प्राण्यांना धोका आहे,यापूर्वी किती नुकसान झाले ते समितीसमोर सांगण्यात आले.तसेच वन्य प्राण्यांकडूनही धोका राहील असेही सांगण्यात आले होते.परंतु गांव टापू च्या व्याख्येत बसत नाही व वरील दोन कारणांमुळे मुळगावातून पुनवर्सन करणे शक्य नाही त्यापेक्षा गावात आरोग्य, शिक्षण, पाणी व दळणवळणासाठी रस्ता व पूल बनवून दिला तर प्रश्न सुटेल.व हे काम एका वर्षात होणे शक्य आहे,
पुनर्वसनासाठी जास्त वर्षे लागतील व गाव तुकड्या तुकड्यांमध्ये कुठे कुठे फेकले जाईल म्हणून समितीने 2005 साली पूल सुचवला.परंतु पुलाचे काम अद्याप झाले नाही.2005 पासून कित्येक कलेक्टर बदलून गेले परंतु परिस्थिती जैसे थे.2017/18 मध्ये इयत्ता7वीत शिकणारी सपना वादऱ्या पावरा हिचा दुकानात डुनगीतुन जात असताना डुनगी पालटल्याने तिचा मृत्यू झाला.बऱ्याच वेळा आंदोलन झाले,पत्रव्यवहार झाले,वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पुलाला भेट दिली परंतु पूल आजही पूर्ण झालेला नाही.
मा.सतीश भिंगारे,WALMI,चे भूतपूर्व डायरेक्ट जनरल,eng-in-chief यांना, नर्मदा जीवन शाळा व भागाचा दौरा करायचा होता. त्यामुळे त्यांना बालमेळाव्याशी जोडून या भागाचा दौरा नर्मदा बचाओ आंदोलनाशी बोलून नक्की करण्यात आला.त्यात त्यांनी सावऱ्या दिगरचा पूल खास पहावा व तेथील गावकऱ्यांशी चर्चा करावी असे वाटत होते त्यानुसार भिंगारे सरांनी बालमेळा नंतर म प्र च्या बुडीत क्षेत्राचा दौरा केला व दिनांक 16/2/2023 रोजी म. प्र.च्या खाऱ्या भादल येथील जीवन शाळेला भेट देऊन, बोटीने सावऱ्या दिगर येथे पोहोचले.सावऱ्या दिगर येथे नर्मदा बचाओ आंदोलनाचे मान्या पावरा, डेकल्या पावरा,गुलाबसिंग पावरा,दिलीप पावरा(सरपंच) रोहिदास पावरा,विरसिंग पावरा, रुमाल्या पावरा ,वादऱ्या पावरा,सियाराम पाडवी व चेतन साळवे सह 60 ते 70 स्त्री पुरुष उपस्थित होते. मान्या पावरा यांनी गाऱ्हाणे मांडले की आम्ही तेंव्हाच म्हणत होतो की आमचे पुनर्वसन करा!आम्हाला शासनाचा चांगला अनुभव आहे रस्ता लवकर पूर्ण होणार नाही.
रोहिदास पावरा यांनी सांगितले की आम्हाला असं वाटतं की आम्ही भारताचे नागरिकच नाहीत म्हणून सरकार अशी वागणूक देत आहे. सरपंच दिलीप पावरा यांनी सांगितले की आम्ही पिढ्यानपिढ्या येथे राहतो,आमच्या गावचे वनाधिकार अंतर्गत 338 दावे दाखल आहेत परंतु फक्त 8च दावे पात्र झाले. आमच्या गावातील पाटील पाडा बुडितात जात असल्याने तेथील कुटुंबाचे जमिनीला जमीन देऊन पुनर्वसन झाले.
भिंगारे सरांनी विचारले अजून काय समस्या आहेत? लोकांनी सांगितले की देशाला स्वातंत्र्य मिळून75 वर्षे झाली परंतु आजही आमच्या 12 पाड्यांच्या गावांपैकी 2च पाड्यात आताकुठं वीज पोहोचली आहे,पाण्याचे हातपंप बरेच बंद आहेत,जि. प.शाळेत 2 शिक्षक होते त्यातील एक रिटायर्ड झाले व एक ही कधीतरी येतात.नर्मदा नवनिर्माण अभियानाच्या जीवन शाळेत मुलं शिकतात. साधं दळण दळण्यासाठीही उन्हाळ्यात पाणी असते तेंव्हा नावडीतून व पाणी ओसरल्यावर चिखलातून पाय रुतवत जावे लागते.आरोग्य सुविधा बाबत बराच पाठपुरावा करून PHU आणले परंतु तेथील डॉक्टर प्रतिनियुक्तीवर राजबर्डी phc ला आहेत.नर्मदा विकास विभागाने पावसाळ्यात येण्याजाण्यासाठी बार्ज ठेवली होती ती गेल्या दीड महिन्यापासून नाहीये त्यामुळे नावडी वाल्यास प्रति माणशी 40 रुपये द्यावे लागतात व मोटार सायकल नावडीतून नेण्यासाठी100 रुपये. *आता आम्हाला पूल नको रस्ता नको.आमचेही पुनर्वसन व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. असा समस्यांचा पाढाच वाचला.
यावर मा.सतीश भिंगारे सरांनी सांगितले की मला वाटले होते की,पुनर्वसन करणे अवघड प्रक्रिया असते वेळ जातो,लोकं विखुरली जातात ! त्यापेक्षा एका वर्षात हा पूल व रस्ता होईल म्हणून हा रस्ता सुचवला होता त्याचे आता मला पश्चाताप होत आहे. मी पुन्हा शासनाला लिहीन व मागणी करेन कि वरील सर्व प्रश्न सुटले पाहिजेत.व पूल ही लवकरात लवकर तयार व्हायला पाहिजे.
योगायोग म्हणजे 16/2/2005 ला हा अहवाल पूर्ण झाला होता व आज तब्बल 18 वर्षानंतर त्याच तारखेला समितीचे अध्यक्ष त्या गावात आले होते.