Type Here to Get Search Results !

कृषी यांत्रिकीकरण योजनेत जिल्ह्यातील 1 हजार 874 लाभार्थ्यांना 12 कोटी 24 लक्ष अनुदानाचे वाटप



कृषी यांत्रिकीकरण योजनेत जिल्ह्यातील 1 हजार 874 लाभार्थ्यांना 12 कोटी 24 लक्ष अनुदानाचे वाटप;


शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन


नंदुरबार, दि.21 : कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजना या तीनही योजनेतंर्गत नंदुरबार जिल्ह्यात सन 2022-2023 या चालू आर्थिक वर्षांत आजपर्यंत 1 हजार 874 शेतकऱ्यांना 1224.28 लक्ष रूपयांचे अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. 


यात राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत सन 2022-2023 मध्ये 1 एप्रिल,2022 ते आजपर्यंत अनुसूचित जातीच्या 6 लाभार्थ्यांना 2.21 लक्ष, अनुसूचित जमातीच्या 190 लाभार्थ्यांना 88.08 लक्ष, सर्वसाधारणच्या 104 लाभार्थ्यांना 39.46 लक्ष अशा एकूण 300 लाभार्थ्यांना 129.75 लक्ष रुपयांचे अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.


कृषि यांत्रिकीकरण उपअभियान योजनेतंर्गत अनुसूचित जातीच्या 26 लाभार्थ्यांना 16.61 लक्ष, अनुसूचित जमातीच्या 337 लाभार्थ्यांना 225.31 लक्ष, तर सर्वसाधारण गटाच्या 80 लाभार्थ्यांना 182.16 लक्ष असे एकूण 443 लाभार्थ्यांना 424.08 लक्ष रूपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. राज्य पुरस्कृत यांत्रिकीकरण योजनेतंर्गत सर्वसाधारण गटाच्या 1 हजार 131 लाभार्थ्यांना 670.45 लक्ष रूपयांचे अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. 


कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक शेतकरी, सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, कल्टीव्हेटर, पल्टी नांगर, ट्रॅक ट्रॉली, मिनी दाल मिल, कंम्बाईन हार्वेस्टर, रिपरकमबाईंडर (ट्रॅक्टरचलित) मिनी राईस मिलसाठी कमाल मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी https://mahadbtmahait.gov.in पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली एकाच अर्जाद्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी जमिनीचा सातबारा उतारा, 8 अ उतारा, बॅक पासबुक, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र या कागदपत्राची माहिती पोर्टलवर नोंदवावी. लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल. निवड झालेल्या लाभार्थ्यााना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस संदेश देण्यात येतो.


सन 2022-2023 वर्षांपासून कृषि यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही बदल केले असून ते पुढील प्रमाणे आहेत. ट्रॅक्टर चलित औजारांसाठी आर.सी.बुक बंधनकारक राहील. रोखीने खरेदी न करता कॅशलेस पद्धतीने औजारांची खरेदी करणे बंधनकारक असेल. पुर्वसंमती अपलोड केलेल्या कोटेशन व रिपोर्ट प्रमाणेच औजाराची खरेदी करणे बंधनकारक राहील. एकाच वर्षात जास्तीत जास्त 3 औजारे किंवा अनुदान रक्कम 1 लाख पर्यंत लाभ देण्यात येईल. ज्या औजारासाठी अनुदानाची रक्कम रुपये 1 लाखापेक्षा जास्त आहे. अशा औजारासाठी एका वर्षांत फक्त एकच औजारासाठी अनुदान देय राहील. अनुदान देण्यात आलेल्या ट्रॅक्टरची किमान 6 वर्ष ट्रॅक्टर चलित औचाराची किमान 3 वर्ष विक्री करता येणार नाही. 1 लाखापेक्षा जास्त अनुदान देय असलेल्या यंत्र, औजारांसाठी एकाच कुटूंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांची निवड झाली असल्यास कोणत्याही एकाच सदस्यास संबंधीत औजारासाठी अनुदान देय असेल.


लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर अधिकृत विक्रेत्याकडून औजारे, यंत्रांचे दर कोटेशन, टेस्टिंग रिपोर्ट, मागास प्रवर्गातील शेतकरी असल्यास जात प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावेत. ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्यांची छाननी झाल्यानंतर कृषि विभागामार्फत पुर्वसंमती प्रक्रिया पुर्ण होते. पुर्वसंमती दिल्यानंतर 30 दिवसाच्या आत औजारे व यंत्रे खरेदी करुन बिल अपलोड करणे बंधनकारक आहे. जे पात्र शेतकरी दिलेल्या विहित मुदतीत सदर घटकांचा लाभ घेणार नाही त्यांची निवड आपोआप रद्द केली जाईल. 


यांत्रिकीकरण औजारे व यंत्रासाठी ऑनलाईन पद्धतीने कमी वेळात सर्व प्रक्रिया पार पाडली जात असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्याचे आवाहन नाशिक विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad