वाढत्या गारठ्याने सिकलसेल ग्रस्तांच्या वेदनेत वाढ
तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथा परिसरात सध्या गारठ्यात चांगलीच वाढ झाली असल्याचे चित्र असून सिकलसेल आजाराने त्रस्त रुग्णांच्या दुखण्यातही वाढ झाली असल्याचे चित्र आहे. या आजारात रक्तपेशी या अर्धचंद्राकृती आकाराच्या होऊन त्या एकमेकांना जोडल्या गेल्याने अडकून पडतात, त्यामुळे सिकलसेलग्रस्त रुग्णांच्या हातपाय दुखण्याच्या प्रकारात वाढ झाली असल्याचे चित्र असून त्यांच्याकडून आरोग्य उपकेंद्र ,प्रा आ केंद्र ,उपजिल्हा रुग्णालय तसेच खाजगी दवाखाने येथे जाऊन उपचार करून घेण्यात येत आहेत .
सिकलसेल रुग्णांना रक्तालप्ता,अंगात बारीक ताप येणे ,लवकर थकवा वाटणे, सांधेदुखी, शरीरावर हलकीशी सूज ,प्लिहावर सूज येणे ,डोळे पिवळे दिसणे, हलक्याशा कामाने श्वासोच्छ्वास वाढणे यासारखे लक्षणे जाणवत असून सिकलसेलग्रस्तांकडून भरपूर पाणी पिणे, निरोगी आहार ,हिमोग्लोबिन युक्त फळांचे सेवन, नियमित व्यायाम ,फॉलिक ऍसिडच्या गोळ्या यांचे सेवन करून आपले आरोग्य सुदृढ कसे राखता येईल याबाबत प्रयत्न करण्यात येत आहे तसेच त्यांच्याकडून थंड तापमानात जाणे ,बाहेरचे खाणे ,धूम्रपान यासारख्या गोष्टी टाळल्या जात आहेत.
दरम्यान तालुक्यातील बहुतांश सिकलसेलग्रस्तांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागामार्फत राबवण्यात आलेल्या सिकलसेल सप्ताहात स्वयंस्फूर्तीने तपासणी करून घेतली होती व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेले औषधे,आहार तसेच घ्यावयाची काळजी याबाबत त्यांच्याकडून तंतोतंत पालन करण्यात येत असल्याने त्यांना दुखण्यापासून काही अंशी दिलासा मिळाला असल्याचे चित्र आहे.
चौकट
सिकलसेल या अनुवांशिक आजाराने दुर्गम भागात हातपाय पसरविण्यास सुरुवात केली असुन हा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासन व सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेणे गरजेचे असुन मोफत औषधोपचार व व्यापक जनजागृती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.