प्राचार्य जी. एच. महाजन इंग्लिश मिडियम स्कुल सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन साजरा
तळोदा, ता. ३ सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आपले सर्वांचे अस्तित्व आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांना जीवंत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. त्यांनी शिक्षणाची महती ओळखून महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडी केलीत. त्यामुळेच आज शिक्षण घेऊन असंख्य महिला विविध क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत आहेत. जोपर्यंत त्यांचे विचार आपण अंगिकारत नाही, तोपर्यंत समाजाला व देशाला योग्य दिशा मिळणार नाही असे प्रतिपादन उपप्राचार्य अमरदीप महाजन यांनी केले.
येथील प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कुल, श्री शि. ल. माळी कनिष्ठ महाविद्यालय व प्राचार्य जी. एच. महाजन इंग्लिश मिडियम स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवारी (ता. ३) सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी उपप्राचार्य अमरदीप महाजन होते. प्राचार्या शितल महाजन, पर्यवेक्षक बी. जी. माळी, कार्यालयीन अधीक्षक डी. पी. महाले तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. महाजन पुढे म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांचे विचार सर्व समाजातील नागरिकांमध्ये रुजविणे आवश्यक आहे. सावित्रीबाई यांनी खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाचा पाया रचला. पती जोतिबा फुले यांच्यासोबत त्या महिलांच्या उन्नतीसाठी झटल्या व पुरुष प्रधान संस्कृतीला छेद देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विपरीत परिस्थितीत कडवट विचारसरणीशी झुंज देत आपले ध्येय साध्य केले असे त्यांनी सांगितले.
यावेळी मनीषा सोनवणे यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले यांच्या काळात महिलांना अनेक प्रतिबंध होते, महिला मुक्तपणे कुठलीच गोष्ट करू शकत नव्हत्या. अश्या कठीण परिस्थितीत महिलांना योग्यप्रकारे जीवन जगता यावे यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. सावित्रीबाईंनी आधी स्वतः शिक्षण घेतले आणि मग महिला शिक्षणासाठी प्रयत्न केलेत. अनंत अडचणींवर मात करीत त्यांनी स्त्री शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवली असे त्यांनी सांगितले. यावेळी शाळेतील बालगोपालांसह असंख्य विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आपले विचार व्यक्त करीत त्यांच्या जीवनप्रवासाचा उलगडा करीत, त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी मिनल राणे व गौरव सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. ए. व्ही. गिरासे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
चिमुकल्यांनी वेधले लक्ष -
यावेळी प्राचार्य जी. एच. महाजन इंग्लिश मिडियम स्कुलच्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मनोगत व्यक्त करीत उपस्थितांची वाह वाह मिळवली. तसेच असंख्य चिमुकल्या मुलींनी यावेळी हुबेहूब सावित्रीबाई फुले यांच्यासारखा पेहराव केला होता. चिमुकल्यांनी साडी नेसत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.