रांझणी कृषि विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांना अभिवादन
तळोदा तालुक्यातील रांझणी येथील शेठ राणूलाल फुलचंद कृषि तंत्र विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य प्रविण वसावे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिजाबराव पवार यांनी केले. तर राजेश पाडवी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी माहिती देतांना सांगितले की, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. राष्ट्र निर्माणात युवकांचे महत्त्व स्वामी विवेकानंद यांना माहीत होते. युवकात सर्व प्रकारचे बल असते. तारुण्यात प्रवेश करतांना युवा पिढीला अनेक आव्हानांना व स्पर्धेला सामोरे जावे लागते. युवा पिढी इंटरनेट व मोबाईलच्या जाळ्यात अडकत आहे. यंत्राचे आपण गुलाम होण्यापेक्षा यंत्राच्या सहाय्याने आपल्यातील बल वाढवणे, बुद्धीला चालना देणे यासाठी यंत्राचा वापर करावा. चिकाटी धरून अंतरापर्यंत जाऊन शिक्षण घेण्याचे बळ मिळवणे जरुरी आहे. नाविन्याची ओढ, उमेद व जोम आहे. पण योग्य दिशेचा अभाव प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याचे बळ अंगीकारावे. सतत शिकत राहण्याची क्षमता, वृत्ती अंगी बाळगणे जरुरी आहे. सकारात्मक दृष्टी हवी. विवेकानंदाप्रमाणे पराकोटीचे उच्च विचार करणे. उच्च विचार करण्याची सवय लागली की आचरण शुद्ध होते असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच प्राचार्य प्रविण वसावे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देतांना सांगितले की, अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभ करणार्या राजमाता म्हणजे जिजाऊ माता. प्रतिकुल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडविले. जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य, शौर्य, प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि गरीबांप्रति प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले आहे. जिजाऊंनी आत्मविश्वासाने युद्धकलेत नैपुण्य मिळवले याचा उपयोग पुढे शिवरायांना युद्धकला आणि राजनीतीचे शिक्षण देण्यासाठी झाला असे सांगितले.
या कार्यक्रमाला प्राचार्य प्रविण वसावे, प्रा.शरद साठे, जिजाबराव पवार, राजेश पाडवी, दिपक मराठे, जितेंद्र वानखेडे आदींसह विद्यार्थी व विद्यार्थींनी उपस्थित होते. आभार प्रदर्शन दिपक मराठे यांनी मानले.