मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याची मागणी गेल्या १५ ते २० वर्षापासून अतिदुर्गम भागात अल्प मानधनावर सेवा
तळोदा(प्रतिनिधी)मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे यासाठी बिरसा फायटर्सने मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री,जिल्हाधिकारी, आरोग्यधिकारी नंदुरबार यांना निवेदन पाठवून मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्रात मानसेवी वैद्यकीय अधिकारी हे पद सन १९९५ पासून आदिवासी विकास विभागातंर्गत नवसंजीवनी योजनेतंर्गत निर्माण करण्यात आले.तेव्हापासून महाराष्ट्रात शेकडो वैद्यकीय अधिकारी अल्प मानधनावर सेवा देत आहे.महाराष्ट्रात १६ जिल्ह्यात भरारी पथकातील २५७ वैद्यकीय अधिकारी गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी दुर्गम,अतिदुर्गम गाव,वस्ती पाड्यावर अहोरात्र सेवा देत आहे.काही अधिकारी पन्नाशी ओलांडली आहे.कधीतरी कायमस्वरूपी काम होईल या आशेवर आजही अविरतपणे सेवा देत आहे.नंदुरबार जिल्ह्यातील गुजरात व मध्य प्रदेश सीमेवरील नर्मदा काठावरील वसलेल्या ज्या अनेक दुर्गम,अतिदुर्गम पाड्यात रस्ते,वीज,मोबाईल नेटवर्क नाहीत तेथे गरोदर माता तपासणी,प्रसूती,लसीकरण,कुपोषित बालकांची तपासणी,जि.प.शाळेतील विद्यार्थी तपासणी,इतर आजारावर उपचार हे अधिकारी खडतर परिस्थिती जीव मुठीत घालून सेवा देतात.रात्री-अपरात्री तरंगत्या दवाखान्यात वीज नसतांनाही टॉर्चच्या साहाय्याने रुग्णांची तपासणी करून सेवा करतात.गेल्या १५-२० वर्षापासून अतिदुर्गम भागात अनेक हालअपेष्टया सहन करून अहोरात्र रुग्णांची सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील २५७ मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कायम सेवेत सामावून घेण्याची मागणी बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव राजेंद्र पाडवी,जिल्हाध्यक्ष भरत पावरा, कार्याध्यक्ष गणेश खर्डे,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी यांनी केली आहे.
'गेली अनेक वर्षे अतिदुर्गम भागात हालअपेष्टा सहन करत अविरतपणे रुग्णांची सेवा करणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे प्रत्येक सरकारचे दुर्लक्ष होत आहे हे दुर्दैव आहे.महाराष्ट्रातील सर्वच २५७ अधिकाऱ्यांचे लवकरात लवकर कायम सेवेत सामावून घ्यावे'
राजेंद्र पाडवी,राज्यमहासचिव बिरसा फायटर्स
'मानसेवी वैद्यकीय अधिकारी पद १९९५ पासून आदिवासी दुर्गम,अतिदुर्गम पाड्यात कमी मानधनावर सेवा करत आहे.सध्या जिल्ह्यात ४० मानसेवी वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र गट 'ब'चा अनेक जागा रिक्त आहेत.त्या ठिकाणी आम्हाला कायम सेवेत सामावून घ्यावे'.
- डॉ.इंद्रसिंग गावित