युवकांनो व्यसनाधीनता सोडा, स्वाभिमानी व्हा, मातापित्यांची सेवा करा:ह भ प इंदुरीकर महाराज
नंदुरबार:-
युवकांनो व्यसनाधीनता सोडा, स्वाभिमानी व्हा, मातापित्यांची सेवा करा असे भावनिक आवाहन ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी नंदुरबार तालुक्यातील बोराळा येथे केले.
कै लोटन सोनवणे व कै कौशल्याबाई सोनवणे यांच्या स्मरणार्थ मातृ पितृ कृतज्ञता कीर्तन महोत्सवात ते बोलत होते. यावेळी त्यांनी युवक छोट्या मोठ्या आमिषाला बळी पडुन व्यसनाधीन होत असून म्हाताऱ्या आईवडिलांसमोर तरुण मुलांचे मृत्यू होत असल्याचे विदारक चित्र असून युवकांनो व्यसनाधीनता सोडा,विकले जाऊ नका, स्वाभिमानी व्हा, आईवडिलांची सेवा करा असे सांगत मोबाईलचा अतिवापर टाळा, घरात संवाद साधा असे भावनिक आवाहन केले.
यावेळी त्यांनी सध्याच्या ज्वलंत विषयांवर हात घालत युवक, राजकारणी, वाईट रूढी, परंपरा यांवर घणाघात केला.
ह भ प इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा आस्वाद घेण्यासाठी जिल्हाभरातून तसेच नजीकच्या गुजरात राज्यातील गावातुन मोठ्या संख्येने श्रोते दाखल झाल्याने बोराळा गावाला यात्रेचे स्वरूप आल्याचे चित्र होते.