तलावडी आश्रमशाळाला सलग दुसर्यांदा सर्वसामान्य विजेता
तळोदा:- पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संस्थेच्या दिवंगत माजी अध्यक्ष कै. शालिनी जयंत नटावदकर यांच्या २१ व्या पुण्यस्मरणार्थ संस्था अंतर्गत क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि.१७ व २८ जानेवारी २०२३ रोजी अनुदानित आश्रमशाळा भडगुंजा ता.उछल, जि.(तापी) गुजरात येथे करण्यात आले होते.
यावर्षी संस्थांतर्गत क्रीडा महोत्सवात पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाच्या आठ आश्रमशाळा, तीन माध्यमिक विद्यालय व दोन कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश होता. खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल व बुद्धिबळ आदी क्रीडा प्रकारांचा या स्पर्धांमध्ये समावेश होता. संस्थेच्या क्रीडा विभागाच्या परंपरेनुसार ज्या शाळेला सर्वात जास्त क्रीडा प्रकारांमध्ये विजेतेपद व उपविजेतेपद मिळते त्या शाळेला जनरल चॅम्पियनशिप ही ट्रॉफी प्रदान करण्यात येते.
या स्पर्धांमध्ये तलावडी आश्रमशाळेतील १४ वर्ष वयोगट, १७ वर्ष वयोगट मुले खो-खो विजेता, १७ वर्ष मुली खो-खो विजेता, बालगट मुली खो-खो विजेता तसेच बालगट मुले कबड्डी विजेता आणि चौदा वर्ष मुली खो-खो उपविजेता आदी क्रीडा प्रकारांमध्ये चमक दाखवली. वैयक्तिक खेळ प्रकारात बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात राजकुमार वळवी १७ वर्ष वयोगटात प्रथम, सुमन वळवी १७ वर्ष वयोगटात तृतीय, आणि १४ वर्षे वयोगटात बोलसिंग वळवी तृतीय क्रमांक पटकावून पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाच्या क्रीडा विभागाच्या परंपरेत पहिल्यांदा आश्रमशाळा तलावडीने उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. आतापर्यंत झालेल्या कोणत्याही क्रीडा महोत्सवात सलग दोन वर्ष जनरल चॅम्पियनशिप म्हणजेच सर्वसाधारण विजेतेपद अजून कुठल्याही शाखेला अबाधित ठेवता आलेले नव्हते. परंतु आश्रमशाळा तलावडीच्या मुख्याध्यापकांचा, विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा व येथील सर्व कर्मचारी वृंदाचा निर्धार होता की आपण आपल्याकडे आश्रम शाळा मोलगी येथील क्रीडा महोत्सवातील आणलेल्या जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी ला यावर्षीही परत आपल्याकडे आणूया. यासाठी वर्षभर केलेल्या सूक्ष्मत्तम नियोजन, कठोर परिश्रम आणि त्याला क्रीडा मंडळाकडून मिळालेले मार्गदर्शन या सर्वांच्या बळावर पुनश्च तलावडी आश्रमशाळेने सर्वसाधारण विजेतेपद अबाधित राखले.
या सर्व विजेत्या खेळाडूंचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व तलावडी टीमचे पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष सुहास नटावदकर यांनी विशेष कौतुक केले. या यशस्वी विद्यार्थ्यांना माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक पी.डी.साळुंखे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक एस.एस.पवार, अधीक्षक प्रविण वसावे यांचे मार्गदर्शन लाभले. क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक अमोल पाटील, दशरथ पाडवी, साईनाथ वळवी, श्रीमती काश्मिरा पाटील, श्रीमती अलका तिडके, दिलीप पाटील, श्रीमती बबीता गावित, श्रीमती धनश्री अजगे, श्रीमती नीता पावरा, राहुल जोशी, विजय मलाई आदींनी परिश्रम घेतले.