महसुल विभागाचे उदासिनतेमुळे एका गावात दोन सरपंच विराजमान
निवडणुक आयोग आणि मुख्यमंत्री सचिवालयात तक्रार दाखल
ठाणे मुरबाड दिनांक १ प्रतिनिधी लक्ष्मण पवार
मुरबाड तालुक्यातील महसुल विभागाचे उदासिनतेमुळे बारवी धरणामुळे बाधित झालेल्या मोहघर आणि तोंडली गावांचे स्थलांतर करुन त्यांना स्वतंत्र महसुल दर्जा न देता म्हसा गावात मोहघरचा व सासणे गावात तोंडलीचा असे दोन दोन सरपंच विराजमान झाले असल्याने महसुल विभागाचे कारभाराची भांडाफोड करण्यासाठी पत्रकार प्रकाश जाधव यांनी राज्य निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री सचिवालयात तक्रार दाखल केली असून जर स्थलांतरित गावांना स्वतंत्र दर्जा न मिळताच प्रशासनाने निवडणुक प्रक्रिया राबविली कशी असे म्हणत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
बारवी धरणाची उंची वाढीमुळे मोहघर आणि तोंडली ही गावे पाण्याखाली गेली असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तेथील गावांना आपल्या घराचे क्षेत्रफळानुसार तसेच जमिनीची भरपाई व घरटी, नोकरी देऊन मोहघर गावचे म्हसा येथे व तोंडली गावांचे सासणे भौगोलिक क्षेत्रात पुनर्वसन करुन त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.परंतु या सर्व प्रक्रिया करत असताना महसूल विभागाने या स्थलांतरित गावांना स्वतंत्र महसुल दर्जा न दिल्याने या स्थलांतरित गावाच्या ग्रामपंचायत निवडणुका म्हसा व सासणे गावच्या भौगोलिक क्षेत्रात पार पडल्या असल्याने एका गावात दोन दोन सरपंच विराजमान झाले असले तरी आपल्या ग्रामपंचायत च्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या मोहघर व तोंडली येथिल रहिवाशांनी गेले चार वर्षांपासून केलेली घराची बांधकामे ही अतिक्रमणे असुन या घर मालकांनी जर म्हसा व सासणे ग्रामपंचायत कडे रितसर घरपट्टी भरली तर या ग्रामपंचायतीच्या तिजोरीत लाखोंची भर पडेल आणि ग्रामस्थांना मुलभूत सुविधा देखील देता येतील. त्यामुळे महसूल विभागाने या स्थलांतरित गावांचा म्हसा किंवा सासणे गावात समावेश करुन त्यांची एकत्रित ग्रामपंचायत करावी किंवा त्या गावांना स्वतंत्र महसुल दर्जा देण्यात यावा अशी मागणी होत असुन विराजमान झालेल्या सरपंचावर निवडणूक आयोग व मुख्यमंत्री सचिवालय काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.