कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक स्थगित इच्छुकांची हिरमोड
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका दि. १५ मार्च २०२३ पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील ६ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह राज्यभरातील बाजार समित्यांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत.
तळोदा उत्पन्न बाजार समितीसाठीही मोर्चे बांधणी सुरू झाली होती. त्यात कोणत्या नेत्यांची काय भूमिका असेल या बाबत चर्चा होती. मात्र आता या चर्चेला तूर्तास पूर्ण विराम मिळाला आहे.
तळोदा तालुका बाजार समितीसह जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर डिसेंबरपर्यंत हरकती मागवण्यात आल्या. दि.२ डिसेंबरपर्यंत त्यावर निर्णय देण्यात आला. आता अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होणार होत्या. जानेवारी पासून प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम सुरू होणार होता. या निवडणुकांसाठी दि. २९ जानेवारी २०२३ रोजी मतदान आणि ३० जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दरम्यान, तळोदा कृषी उत्पन्न बाजार समिती राजकीय केंद्र बिंदू असून विद्यमान आमदार राजेश पाडवी यांनी निवडणूक लढवण्यासाठी तयारी दर्शवली होती. माजी आमदार उदेसिंग पाडवी यांचे बाजार समिती वर प्रभुत्व असल्याने या दोघा आजी-माजी आमदारांची भूमिका वेगवेगळी असल्याने निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशात बाजार समितीच्या निवडणुका १५ मार्च २०२३ पर्यंत स्थगित करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नंदुरबार, तळोदा, शहादा, नवापूर, धडगाव, अक्कलकुवा या बाजार समित्यांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली होती. त्यावर हरकतीही मागवण्यात आल्या होत्या. मात्र, निवडणुका स्थगित झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला..