सशस्त्र सेना ध्वजनिधीस प्रत्येक नागरिकांनी योगदान द्यावे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन
नंदुरबार :- देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजनिधी संकलनाच्या माध्यमातून ऋण फेडण्याची हीच संधी असून जिल्ह्यातील प्रत्येक नागरीकाने ध्वजनिधी संकलनात मोठ्या प्रमाणात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत क्रांतीवीर बिरसा मुंडा सभागृहात आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन-2022 निधी संकलन शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती खत्री बोलत होत्या. या कार्यक्रमाला सहायक जिल्हाधिकारी मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, उप विभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी, सुभेदार मेजर रामदास पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण अर्पण केले, अशा जवानांच्या कुटुंबियाच्या जीवनातील अडीअडचणी दूर करुन त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्याच प्रमाणे युद्धात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र सेनादलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी समाजाप्रती आपले काही देणे आहे या भावनेतून अशा जवानांच्या सन्मानासाठी ध्वजदिन संकलन करण्यात येतो. मागील वर्षी ध्वजदिन निधी संकलनात जिल्ह्यातील सर्व विभागांनी अतिशय चांगले काम करुन 103 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. मागील वर्षांप्रमाणे यावर्षी 100 टक्के पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक, खाजगी आस्थापना, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ध्वजदिन निधी संकलनामागील भूमिका विषद करुन त्यांनी सांगितले की,. जिल्ह्याला गेल्या वर्षी 36 लाख 30 हजार रुपये निधी संकलनाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी जिल्ह्याने 37 लाख 63 हजार 609 इतके उद्दिष्ठ पूर्ण केले. जिल्ह्यात मागीलवर्षी सर्वाच्या सहकार्याने उद्दिष्टापेक्षा अधिक निधी संकलीत झाला आहे याबद्दल जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, शैक्षणिक संस्था, व जिल्हा परिषद तसेच सर्व देणगीदारांचे आभार मानून मागील वर्षी दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे यावर्षीही उद्दिष्ट पूर्ण करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्ह्यातील दानशूर नागरीक भास्कर कासार, श्रीमती. स्नेहल पाटील, कमलेश थोरात यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांना प्रेरीत करुन स्वेच्छेने ध्वजनिधी संकलनात सहभागी गट विकास अधिकारी पंचायत समिती, अक्कलकुवा. अधिक्षक,राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, नंदुरबार, तालुका कृषि अधिकारी ,शहादा, प्राचार्य शासकीय तंत्र निकेतन, नंदुरबार, तहसिलदार, तळोदा, प्राचार्य विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय व न्यू इंग्लीश स्कुल,तळोदा, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय,नंदुरबार, प्राथमिक आरोंग्य केंद्र,जांगठी ता.अक्कलकुवा या कार्यालयांचे विशेष योगदान लाभले त्या निमित्त सर्वांना मान्यवराच्या हस्ते प्रशस्तीपत्रक, मानपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
प्रारंभी दिप प्रज्वलन करुन शहीद राजाराम खोत आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थिंनीनी देशभक्तीपर व स्वागत गीत सादर केले. त्याचबरोबर पोलीस बॅन्डपथकातील कर्मचाऱ्यांनी मानवंदना देवून शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी वीर पत्नी माधुरी पाटील व छाया खोत यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एनसीसी विद्यार्थी व आजी- माजी सैनिकांचे प्रशासकीय काम उत्कृष्ट केल्याबाबत त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.विष्णू जोंधळे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक आर.डी.पाटील, वरिष्ठ लिपिक सयाजी बेरड, लिपिक नि टंकलेखक जितेंद्र सरोदे, प्रशांत लिंगायत, संजू पगारे, जिल्हाधिकारी कार्यालयातील सुभाष शिंदे यांच्यासह सैनिकांच्या वीर पत्नी, विरमाता, विरपिता, माजी सैनिक, त्यांचे कुटूंबिय यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.