शुद्ध व दर्जेदार पदार्थांसाठी जनजागृतीची मोहिम राबवावी - जिल्हाधिकारी मनीषा खत्री
नंदुरबार: ग्राहकांना शुद्ध व दर्जेदार वस्तुंचा व पदार्थाचा पुरवठा करण्यासाठी सर्वांनी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे, त्यासाठी जनजागृतीची मोहिम राबवावी अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात अन्न सुरक्षा व मानके सनियंत्रण समितीची बैठक पार पडली. त्यावेळी श्रीमती खत्री बोलत होत्या. यावेळी जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी राजेंद्र बिरारी, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक दिलीप पाटील, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दिनेश तांबोळी, पोलीस निरीक्षक श्री.खेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील डॉ.अमितकुमार पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील एस.के.चौधरी अन्न सुरक्षा अधिकारी आ.भा.पवार, समाधान बारी, प्रदीप वळवी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की,अन्न पदार्थामध्ये भेसळ कशी ओळखावी यासाठी ग्राहकांना जागृत करण्यासोबतच परवाना नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करावे. जिल्ह्यातील नागरिकांना स्वच्छ व दर्जेदार मालाचा पुरवठा करण्यासाठी अन्न सुरक्षा कायद्यानुसार दिलेल्या मानांकनानुसार वेळोवेळी अन्न पुरवठा व विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी करावी. कौशल्य व उद्योजकता विभागाशी समन्वय साधून ओएनडीसी प्रकल्पाअंतर्गत महिला बचत गट व सुक्ष्म उत्पादकांसाठी परवाना नोंदणी शिबीराचे आयोजन करावे.
88 हजाराच्या दंडाची वसुली
सहाय्यक आयुक्त श्री. तांबोळी यांनी, 1 एप्रिल 2022 पासून जिल्ह्यात अन्न व आस्थापनांची तपासणी करुन 88 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. आगामी काळात जिल्ह्यात अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर मोहिमस्तरावर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.