जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना; नागरिकांना अर्ज व निवेदने स्थानिक स्तरावर देता येणार
नंदुरबार जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला असून नागरिकांना आपली निवेदने व अर्ज थेट या कक्षात देता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य सचिवांनी दिल्या आहेत. त्यानुसार नंदुरबार येथे जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षात सर्वसामान्य जनतेकडून मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले दैनंदिन अर्ज, निवेदने, संदर्भ इत्यादी स्विकारण्यात येवून त्याची पोचपावती संबंधित अर्जदारास देण्यात येईल. ज्या प्रकरणात जिल्हास्तरावरुनच कार्यवाही होणे अपेक्षित आहे. अशा प्रकरणांचा निपटारा जिल्हास्तरावरच करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी मुख्यमंत्री सचिवालय व शासनस्तरावर असलेली कामे व त्यासंदर्भातील अर्ज, निवेदन जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडे लेखी स्वरुपात द्यावेत, असे आवाहन ही श्री. खांदे यांनी केले आहे.