तळोदा प्राचार्य भाईसाहेब जी. एच. महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 'मार्केट-डे' तसेच दप्तराला एक दिवस विश्रांती देत 'बाल आनंद' मेळावा
तळोदा :- शाळेतील चिमुकल्यांना एक वेगळा व नाविन्यपूर्ण अनुभव देण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी येथील प्राचार्य भाईसाहेब जी. एच. महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 'मार्केट-डे' तसेच दप्तराला एक दिवस विश्रांती देत 'बाल आनंद' मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच बाल वयातच व्यावहारिक ज्ञान मिळावे हा उद्देश या उपक्रमांमागे होता.
अध्यापक शिक्षण मंडळ धुळे-नंदुरबार संचलित येथील प्राचार्य भाईसाहेब जी. एच. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मार्केट डे व आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे कार्यवाह आर. व्ही. सुर्यवंशी, संचालक पी. बी. महाजन उपस्थित होते. यावेळी इंग्लिश मिडियमच्या प्राचार्या शितल महाजन, विद्यालयाचे उपप्राचार्य अमरदीप महाजन, पर्यवेक्षक बी. जी. माळी व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शाळेचा आवारात मार्केट-डे निमित्त बाजार भरवण्यात आला. यात इयत्ता पहिली ते पाचवीच्या चिमुकल्यांनी किराणा दुकाने, कापड दुकाने, कटलरी दुकानं, फळांची दुकाने, दवाखाना, मेडिकल, बस स्टँड, भाजीपाला दुकाने आदी थाटली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी कांदे, बटाटे, हिरवी मिरची, कोथिंबिर, मटकी, गवती चहा, वांगी, पालक, मेथी, गवार यासह वह्या, पुस्तके, कपडे असे विविध साहित्य आणून दुकाने थाटली होती. यावेळी विविध दुकानांची पाहणी करण्यासाठी शिक्षकांनी, पालकांनी गर्दी केली होती. यानिमित्ताने शाळेत आठवडे बाजारच भरल्याचे दृश्य दिसून येत होते.
यावेळी आनंद मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले, विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने विविध खाद्यपदार्थांचे दुकाने मांडण्यात आली होती. चिमुकल्यांनी मसाला पोंगे, पाववडा, मिसळपाव, बटाटावडा, इडली-सांबर, पाणीपुरी, फरसाण, चॉकलेट, कॅटबरी, गुळाचा चहा, कॉफी, ज्यूस असे विविध रुचकर खाद्यपदार्थ व पेयांचीत स्टॉल लावली होती. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व उपस्थित पालकांनी मेळाव्यातील स्वादिष्ट पदार्थांवर चांगलाच ताव मारला होता. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इंग्लिश मिडियमचे गौरव सूर्यवंशी, श्वेता माळी, नेहा नेरकर, अश्विनी राणे, कविता मराठे, प्रीती चव्हाण, कनुबाई आदींनी परिश्रम घेतले.