दम आहे म्हणूनच आम्ही फलटण तालुक्याचा विकास केला : रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचा आ. गोरेंवर पलटवार
गेला 30 वर्षाच्या सत्ता संघर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे मा. सभापती, आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यातील मूलभूत गरजांसह धोम बलकवडी सारख्या मोठ्या योजनेमुळे फलटण तालुक्यातील 83 टक्के क्षेत्र ओलिताखाली आले असल्याचे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगतानाच, दम आहे म्हणूनच फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास करु शकलो असल्याचा पलटवार भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर केला.
विडणी येथील झालेल्या भाजपा प्रणित विडणी विकास आघाडीच्या कोपरा सभेमध्ये बोलताना आ. जयकुमार गोरे यांनी आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर तुमच्यात कामाचा दम नसल्याने मला घाटावरून खाली यावे लागत असल्याचे टीकास्त्र सोडले होते. या टिकेला उत्तर देताना, रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, तुमच्या खासदारात दम असता तर तुम्हाला घाटावरून खाली यावे लागले असते का? असा प्रतिप्रश्न आ. जयकुमार गोरे यांचे नाव न घेता उपस्थित केला.
शेतकऱ्यांचा पाण्याचा मूलभूत प्रश्न रामराजे यांच्या माध्यमातून सुटल्याने खऱ्या अर्थाने फलटण तालुका सुजलम सुफलाम झाला असल्याचे यावेळी रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी बोलताना रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी 30 वर्षाच्या सत्तेमध्ये धोम बलकवडीचा उल्लेख करतानाच फलटण तालुक्यातील श्रीराम सहकारी साखर कारखाना व फलटण शुगर वर्क्स या दोन्ही कारखान्यांना रामराजे यांच्या मुळेच ऊर्जित अवस्था प्राप्त झाल्याने आज शेतकऱ्यांना सुखाचे दिवस असल्याचे सांगताना हे दोन्ही कारखाने दुर्दैवाने बंद झाले असते तर शेतकऱ्यांवर आज काय वेळ आली असती हे सांगताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाला कमी पडणार नाही असे आश्वासन यावेळी रघुनाथराजे यांनी दिले.
ते ग्रामपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने आयोजित विडणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उत्तरेश्वर पॅनल विडणीच्या कोपरा सभेत बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, डॉ. रवी शेंडे, सरपंच पदाचे उमेदवार सुरेश विठ्ठल नाळे यांच्यासह ग्रामपंचायत व सोसायटीचे माजी पदाधिकारी उपस्थित होते.