पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना नियमित विद्यावेतनाची प्रतीक्षा
तीन वर्षांचा शिक्षणसेवक कालावधी पुर्ण होऊनही पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षक आजही दुर्गम अतिदुर्गम भागात आश्रमशाळांमध्ये शिक्षणाचा गाडा जबाबदारीने पुढे नेत असुन ह्या शिक्षकांना नियमित विद्यावेतनाची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे.
राज्यात सन 2019 मध्ये शिक्षण विभागात शिक्षकांची पदभरती ही अभियोग्यता चाचणी व शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे जाहिरातनुसार भरती करण्यात आली होती. शालेय शिक्षण विभागातील सर्व माध्यमाच्या शाळेत पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण भरती ही विविध आरक्षण, विषय व अभियोग्यता चाचणीतील गुणांद्वारे करण्यात आली होती. त्याचप्रमाणे राज्यातील आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळेत विभागाच्या शासन निर्णयानुसार विशेष भरती प्रक्रिया राबवुन शंभर टक्के शिक्षण संवर्गाची भरती करणेबाबत निर्देशित आहे. त्यानुसार अप्पर आयुक्त नाशिक कार्यालयांतर्गत मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळेत सदर शासन निर्णयाच्या अटी व शर्तीनुसार ऑनलाईन परीक्षा घेऊन माध्यमनिहाय,विषयनिहाय व समांतर आरक्षणानुसार निवड यादी जाहीर करुन शिक्षकभरती प्रकिया राबविण्यात आली होती.
दरम्यान सदर भरती प्रकिर्येतील नियुक्त झालेल्या शिक्षकांनी शिक्षणसेवक तीन वर्षांचा कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण केला असुन या शिकसेवकांचे नियमित वेतनश्रेणीचे प्रस्ताव अप्पर आयुक्त कार्यालय नाशिक येथे तीन महिन्यापूर्वी सादर करण्यात आले असून त्यांना अद्यापही नियमित वेतनश्रेणीचा लाभ देण्यात आलेला नसल्याने जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागात तुटपुंज्या मानधनावर सातपुड्यातील शिक्षणाचा गाडा हाकणाऱ्या ह्या शिक्षकांना नियमित वेतनश्रेणीचा लवकरात लवकर लाभ द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
राज्यात सांगली, सातारा, पुणे, औरंगाबाद, पालघर या जिल्ह्यातील शिक्षणसेवकांना नियमित वेतनश्रेणीत सामावुन घेण्याचे आदेश मिळालेत त्याचप्रमाणे जिल्ह्यातील आश्रमशाळेतील शिक्षकांनाही लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा जिल्ह्यातील आश्रमशाळेतील शिक्षकांकडून व्यक्त होत आहे