Type Here to Get Search Results !

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची माहिती; माळशेज घाटात काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन


केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची माहिती; माळशेज घाटात काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन


मुरबाड, दि. ३० (प्रतिनिधी) : कल्याण-मुरबाड काँक्रीट रस्त्याच्या कामासाठी ९८४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्यामुळे कल्याण-मुरबाड-नगर परिसराला विकासाला वेग येईल, असा विश्वास केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.


माळशेज घाटातील रस्त्यावर खड्डे पडतात. त्यात काही ठिकाणी तीव्र चढ-उतार असून, अपघाताची भीती असते. या पार्श्वभूमीवर माळशेज घाट रस्त्याचे काँक्रिटीकरण, संरक्षक भिंत आणि सुरक्षिततेची कामे करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी ११५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. मुरबाड तालुक्यातील सावरणे येथे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आज भूमिपूजन झाले. या वेळी माजी आमदार दिगंबर विशे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हा परिषदेच्या सभापती रेश्मा मगर, जिल्हा परिषदेचे सदस्य देवेश पाटील, सुभाष घरत आदींची उपस्थिती होती.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ग्रामीण भाग मजबूत करण्याचे स्वप्न आहे. ग्रामीण भागाचा विकास झाल्यास शहरांवर ताण येणार नाही. त्यादृष्टीकोनातून सध्या देशभरात विकासाची कामे सुरू आहेत. पंढरपूर पालखी मार्गाप्रमाणे कल्याण-मुरबाड-नगर मार्गावरून मोठ्या संख्येने शिर्डी येथे पालखी जातात. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी शिवनेरी व अष्टविनायकाचे दर्शन घेण्यासाठी भाविक जातात त्या दृष्टिकोनातून या महामार्गाचे महत्व आहे, असे कपिल पाटील यांनी नमूद केले. कल्याण-मुरबाड रस्त्याच्या काँक्रीटीकरणामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असून, शेतकऱ्यांना मुंबई-ठाण्यात शेतमाल पाठविता येईल. तर मुरबाडमध्ये शेतीमालाचे चांगले उत्पन्न असून, या पुढील काळात मुरबाड तालुक्यात दुग्ध विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी सध्या सर्वेक्षण केले जात आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले. 


माळशेज घाटात स्वित्झर्लंडहून तयार केलेले बॅरियर बसविण्यात आले आहेत.त्यासाठी १६० कोटी रुपये खर्च आला. त्यामुळे दरड कोसळण्याचे प्रमाण घटले. यापुढील काळात माळशेज घाटात ३०० कोटी रुपये खर्चाचा काचेचा पूल तयार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सध्या या पुलाच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. या कामामुळे माळशेज घाट पर्यटनाच्या जागतिक नकाशावर येईल, असे श्री. कपिल पाटील यांनी सांगितले.


मुरबाड तालुक्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. भावली धरणाच्या धर्तीवर माळशेज घाटाच्या पायथ्याच्या परिसरातील ४० वाड्यांना पाणी मिळवून देण्यासाठी सर्वप्रथम राज्य सरकारमार्फत पाणी आरक्षण निश्चित केले जाईल. त्यानंतर या योजनेचा जलजीवन योजनेत समावेश केला जाईल. मुरबाड तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिले जाईल. कल्याण-मुरबाड रस्त्याच्या रुंदीकरणात बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांना संपूर्ण भरपाई दिली जाईल, असे आश्वासन श्री. कपिल पाटील यांनी दिले. या वेळी दिगंबर विशे, सुभाष पवार, सुभाष घरत आदींची भाषणे झाली.  


कल्याण- मुरबाड रेल्वेचे काम
लवकरच नीती आयोगाकडून मंजूर


कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचा प्रस्ताव मालवाहतुकीच्या दृष्टिकोनातून अव्यवहार्य असल्याचा अहवाल मिळाला होता. तर या मार्गासाठी राज्य सरकारकडून देण्यात येणारा ५० टक्के वाटा महाविकास आघाडीने दिला नव्हता.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर अवघ्या तीन दिवसात राज्य सरकारकडून ५० टक्के पैसे देण्याची हमी दिल्यानंतर सध्या हा प्रस्ताव नीती आयोगाकडे देण्यात आला आहे. या संदर्भात नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांची नुकतीच भेट घेतली.कल्याण-मुरबाड मार्ग भविष्यात नगरला जोडल्यानंतर नक्कीच व्यवहार्य असेल, असे स्पष्ट करण्यात आले. त्यावेळी श्री. बेरी यांनी हा प्रकल्प तूर्त व्यवहार्य नसला, तरी तो मंजूर करण्याचे शाश्वत केले. या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर मिळाल्यानंतर लवकरच रेल्वेकडून काम सुरू होईल,असे कप यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad