बरड अंतर्गत वीज पुरवठा आठ दिवसात सुरळीत करणार : फलटण वीज महावितरणचे शिवसेनेला लेखी आश्वासन
मागील जवळपास दिड दोन महिन्यांपासून वीज महावितरणकडुन बरड सबस्टेशन अंतर्गत फलटण पुर्व भागातील शेतक-यांना शेतीसाठी अनियमित व कमी कालावधीचा वीज पुरवठा मिळत होता. वीजेच्या कमी कालावधीमुळे शेतक-यांना शेतपीकांना पाणी देण्यासाठी मुबलक वीज पुरवठा उपलब्ध होत नव्हता. परिणामी शेतक-यांच्या शेतपीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सदर समस्या सोडवण्यासाठी शेतक-यांनी फलटण तालुका शिवसेनेकडे धाव घेतली.
त्यानुसार शुक्रवार दिनांक 22/12/2022 रोजी फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने फलटण वीज महावितरण कार्यालयास भेट देऊन सोमवार दिनांक 26/12/2022 रोजी शेतक-यांसह भव्य ठिय्या आंदोलन करणार असल्याचा फलटण प्रशासनाला इशारा देण्यात आला होता. परंतु फलटण वीज महावितरणचे मुख्य अभियंता मकरंद आवळेकर, शेख यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत, वीज महावितरणची संपुर्ण यंत्रणा बरड सबस्टेशन अंतर्गत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कामाला लागली असुन सदर समस्येचं निवारण आठ दिवसाच्या करु असे ठाम लेखी आश्वासन दिले असल्याचे शिवसेनेला दिलेल्या पत्रात नमुद केले आहे. वीज महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर शिवसेनेकडुन आंदोलन मागे घेण्यात आले.
फलटण तालुक्यातील विविध गावातील शेतक-यांच्या समस्या देखील मुख्य अभियंता आवळेकर यांना निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. यावेळी शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, प्रभारी फलटण तालुका प्रमुख विकास नाळे, माजी जिल्हाप्रमुख विकास राऊत, शहर प्रमुख निखील पवार, उपतालुका प्रमुख अभिजीत कदम, विभाग प्रमुख किसन यादव व युवराज ताटे, ग्राहक संरक्षण कक्षाचे माजी जिल्हाप्रमुख शैलेंद्र नलवडे, माथाडी कामगार तालुका प्रमुख नंदकुमार काकडे, उपशहर प्रमुख राहुल पवार, राजेंद्र बळीप आदी शिवसैनिक उपस्थित होते.