सारंगखेडा यात्रेत अन्न विक्रेते व पदार्थांची होणार तपासणी
नंदुरबार :- सारंगखेडा यात्रेतील अन्न विक्रेत्यांच्या अन्न पदार्थांची तपासणी होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
सारंगखेडा येथे श्री. दत्त जयंती निमित्त यात्रा सुरु झाली असून यात्रेत मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थांचे विक्री होत असते. सारंगखेडा यात्रेत नागरिकांना योग्य प्रकारचे खाद्य पदार्थ मिळावे यासाठी खाद्य पदार्थ विक्रेत्या आस्थापनांची व अन्न पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे.
या तपासणीत खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडील अन्न परवान्याच्या नोंदणीची तपासणी करण्यात येणार असून विक्रेत्यांना स्वच्छतेबाबत सूचना देण्यात येणार आहे. ही तपासणी यात्रा सुरु असेपर्यंत नियमित करण्यात येणार असल्याचेही श्री.कांबळे यांनी कळविले आहे.