राष्ट्रीय महामार्ग 8 वरील चाँदसैली घाटातील वाहतूक 8 जानेवारी पर्यंत बंद
नंदुरबार, दि.9 :- रोषमाळ-कोठार-तळोदा राष्ट्रीय महामार्ग आठ रस्त्यालगत चाँदसैली घाटातील रस्त्याची दुरुस्तीची कामे करण्यासाठी अत्यावश्यक सेवा देणारी वाहन वगळता इतर वाहनासाठी मार्गावरील वाहतूक 8 जानेवारी 2023 पर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिले आहे.
रोषमाळ-कोठार-तळोदा राष्ट्रीय महामार्ग आठ रस्त्यालगत चाँदसैली घाट (56/850 ते 64/00 लांबी) दरम्यान महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण विभागामार्फत लोखंडी विद्युत वाहिनीचे टॉवर्स उभारणीचे काम करण्यात आले आहे. काम करत असतांना विद्युत वाहिनीच्या टॉवर्स उभारण्यासाठी डोंगराळ परिसरात जागेचे खोदकाम केल्याने तेथील जागा भुसभूसीत झाली असल्याने अवकाळी पावसामुळे किंवा भुस्खलनामुळे परिसरात घाटातून मोठया प्रमाणावर दगड व माती रस्त्यावर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे या मार्गावरील धोकादायक वळणावर तसेच आवश्यक त्या ठिकाणी संरक्षण भिंत उभारणे, खड्याने डागडुजीकरण, रस्त्यांची दुरुस्तीसाठी अत्यावश्यक सेवा देणारी वाहन वगळता 8 डिसेंबर 2022 ते 8 जानेवारी 2023 पर्यंत चाँदसैली घाट मार्गावरील वाहनांची वाहतूक बंद करुन इतर मार्गाने वळविण्यात येत आहे.
हा मार्ग रुग्णवाहिका, अग्नीशमक, गॅस सिलेंडर वाहतूक, शासकीय अन्न व धान्य वितरण इत्यादी वाहने अशा अत्यावश्यक सेवेच्या वाहनासाठीच मार्ग सुरु राहील. मार्गावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिशादर्शक फलक आणि बॅकेटस लावण्यात येवून वाहतुक वळविणेबाबत कार्यवाही व उपाययोजना करुन पथकाची नियुक्ती करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्गावरील रस्त्यांचे दुरुस्तीचे कामे मुदतीत पुर्ण करावी. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.