तळोद्यात ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’निमित्त काढण्यात आली भव्य वाहन फेरी
तळोदा - शेकडो हिंदू प्रेमींच्या सहभागाने तळोदा शहरातून आज शनिवार दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी काढण्यात आलेल्या वाहन फेरीने समस्त तळोदा वासीयांचे लक्ष वेधून घेतले. उद्या रविवार रोजी होणाऱ्या हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या निमित्त नागरिकांना आवाहन करण्यासाठी ही वाहन फेरी काढण्यात आली. प्रत्येक गल्लीत प्रत्येक चौकात धर्मध्वजाचे पूजन करून आणि वाहन फेरीत सहभागी झालेल्या युवकांवर फुलांची उधळण करून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हिंदूवर होणार्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ डिसेंबर २०२२ या दिवशी माळी समाज मंगल कार्यालय, तळोदा येथे सायंकाळी ५:३० वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे.
सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांड हे वक्ते म्हणून या सभेत मार्गदर्शन करणार आहेत. या सभेच्या ठिकाणी क्रांतीकारकांबद्दल माहिती देणारे फलक, हिंदूंना प्रतीदिन करावयाच्या धर्माचरणाच्या कृती, साधना यांविषयी मार्गदर्शन करणारे फलक प्रदर्शन, तसेच हिंदूंमध्ये जागृती करणार्या ग्रंथांचे अन् हिंदूना धर्मशिक्षण देणार्या विविध ग्रंथाचे प्रदर्शनही लावण्यात येणार आहे. तसेच स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात येणार आहेत.
दरम्यान सभेसाठी तळोदा शहर परिसरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रसार चालू असून गेले महिनाभर विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ, लोकप्रतिनिधी यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. या अंतर्गतच सभेच्या प्रचारासाठी आज शनिवार दिनांक १० डिसेंबर या दिवशी वाहन फेरी काढण्यात आली . प्रारंभी धर्मध्वजाचे पूजन करून श्रीदत्त मंदिरापासून आरंभ करण्यात आला. नंतर काका शेठ गल्ली मार्गे बिरसा मुंडा चौकात आल्यावर श्री वसंत पाटील यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला माल्या अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर वाहन फेरी पुढे निघाली. खानदेश गल्ली गणपती गल्ली ठाणे घर गल्ली मोठा माळीवाडा हनुमान मंदिर संविधान चौक एबी चौक या मार्गाने येऊन माळी समाज मंगल कार्यालयात वाहन फेरीची सांगता करण्यात आली. त्या ठिकाणी हिंदू जनजागृती समितीचे श्री अमोल दादा वानखेडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वाहन फेरीत 250 वाहनधारक सहभागी झाले होते.