मयत महिलेच्या वारसदारांना आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते 10 लाख रुपयांचा धनादेश प्रदान
अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा मालीआंबा येथील मोगराबाई रुमा तडवी या महिलेच्या वारसदारांना विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते 10 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
दि. १९ नोव्हेंबर रोजी मालीआंबा येथे घराच्या अंगणात जेवण करीत असतांना बिबट्याच्या हल्ल्यात मोगराबाई रुमा तडवी या महिलेचा मृत्यू झाला होता.दरम्यान विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती.त्यासाठी सदर घटनेची संपुर्ण माहिती आमदार आमश्या पाडवी यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे व विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना दिली होती त्यामुळे डॉ.गोऱ्हे यांनी संबंधितांना तात्काळ भरपाई देण्याचे आदेश दिले होते त्यानुसार वनविभागाने मोगरा बाई यांच्या वारसदारांना तात्काळ 10 लाख रुपये मंजुरीचे आदेश दिले. त्यानुसार अक्कलकुवा येथील वन विभागाच्या कार्यालयात आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते 10 लाख रुपयांचा धनादेश वारसदारांना देण्यात आला. यावेळी तळोदा वन विभागाचे उप वन संरक्षक एल.एम.पाटील, अक्कलकुव्याचे वनक्षेत्र पाल एल.डी.गवळी, वनपाल एस.आर.हजारी वनरक्षक जी.डी.ठाकरे आदी उपस्थित होते.मयत मोगराबाई तडवी यांच्या वारसांना एकुण 20 लाख रुपये देण्यात येणार आहेत त्यापैकी आज 10 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला तर उर्वरित 10 लाख रुपये वारसदारांच्या संयुक्त खात्यावर फिक्स डिपॉझिट करण्यात येणार आहेत.यावेळी आमदार आमश्या पाडवी उप वनसंरक्षक एल.एम.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी मालीआंबा येथील ग्रामस्थ तसेच वन कर्मचारी उपस्थित होते.