गुजरात विधानसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यातील सीमेवरील मद्यविक्रीस बंदी
नंदुरबार, दि. 29 गुजरात राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यातील सीमेवरील 5 किलोमीटर कार्यक्षेत्रात मद्य विक्री करण्यास मनाई असल्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक युवराज राठोड यांनी एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
गुरुवार 1 डिसेंबर 2022 रोजी मतदान तर गुरुवार 8 डिसेंबर, 2022 रोजी मतमोजणी होणार असल्याने मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील हद्दीतील गुजरात सीमेपासून 5 कि.मी अंतरातील कार्यक्षेत्रात ही मनाई लागू असेल.
गुजरात सीमेपासून 5 कि.मी अंतरातील हद्दीत मंगळवार 29 नोव्हेंबर, 2022 ते 1 डिसेंबर,2022 रोजी मतदान प्रक्रया पूर्ण होईपर्यत तर गुरुवार 8 डिसेंबर, 2022 रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी वरील दिवशी सर्व दुकाने बंद ठेवावीत. तसेच मद्यविक्री व अन्य व्यवहार करू नयेत. मद्यविक्री सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल आणि संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.