अर्धापूर तालुक्यात संविधान दिन उत्साहात साजरा | संविधान घडीपत्रिकेचे ११५ शाळेत वाचन
अर्धापूर (२६ नोव्हेंबर)
भारताच्या घटना परिषदेने आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. २६ नोव्हेंबर हा संविधान दिन विविध उपक्रमांतून, उत्साहात साजरा करून लोकशाही संपन्न करूया, असे आवाहन अर्धापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले होते. या आवाहनास सर्व शाळांनी उत्तम प्रतिसाद देऊन विविध उपक्रमांचे आयोजन करून संविधान दिन उत्साहात साजरा केला.
घटना परिषदेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना देशाला अर्पण केली. त्यानंतर दोन महिन्यांनी २६ जानेवारी १९५० पासून या घटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था उभी केली. त्याचे उत्तरदायित्व म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. या विषयी समाजामध्ये जागरूकता आणि लोकशाहीवर निष्ठा निर्माण करण्यासाठी संविधान दिन साजरा करण्यासंदर्भात राज्य सरकारनेही धोरणात्मक निर्णय घेतला आहे. तालुक्यातील सर्व शाळात मोठ्या प्रमाणावर संविधान विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्याचे परिपत्रक पंचायत अर्धापूर शिक्षण विभागाच्या वतीने काढण्यात आले.
याअनुषंगाने अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ६८ व खाजगी ४७ शाळांमधून संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक शाळेने उत्साहात संविधान जागृती फेरी काढली. यावेळी शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट करण्यासाठी गावागावातून ढोल ताशा, विविध वेशभूषांसह प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील सुमारे अठरा हजार विद्यार्थ्यांनी सकाळच्या जनजागृती प्रभात फेरीत सहभाग नोंदवला. विविध स्पर्धांच्या माध्यमातून संविधानाबद्दल माहिती देण्यात आली. संपूर्ण तालुक्यात उत्साही वातावरणात संविधान दिन साजरा करण्यात आला.
संविधान दिन आयोजनासाठी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी गजानन सोनटक्के, लोकदाजी गोडबोले, निजाम शेख, केंद्रप्रमुख विकास चव्हाण, व्यंकट गिते, विनोद देशमुख, शिवाजी सावते, आनंद मुदखेडे, विषयतज्ञ रजाक शेख, माधव पांडागळे आदींनी परिश्रम घेतले.