Type Here to Get Search Results !

जव्हार | कातकरी समाजाची कु.पूनम हिलम पहिली वकील




कातकरी समाजाची कु.पूनम हिलम पहिली वकील ...

जव्हार प्रतिनिधी - दिनेश आंबेकर -

कातकरी समाजातील कु. पूनम विजय हिलम वकील झाली. (मु. वाफे, ता. शहापूर, जि. ठाणे). सर्वांसाठीच ही अभिमानाची आणि आनंदाची घटना आहे.

कातकरी समाज हा प्रिमिटिव्ह आदिवासी मानला जातो. त्यातली पूनम पहिली वकील. सनद घेतल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो आहे. त्याही पेक्षा तिच्या चेहऱ्यावरचं तेज.

राज्यकर्त्यांनी आदिवासींचं अस्तित्व संपवण्याचा विडाच उचलला आहे. महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी तर कातकरी समाजाचं अस्तित्वच संकटात आणलं आहे. त्यांचे मतदार संघ संपवले. त्यांच्या वस्त्या संपवल्या. महसुलातील नोंदही संपवली.




मुंबईच्या शेजारी ठाणे, पालघरमध्ये कातकरी आहे पण खूप कमी प्रमाणात. रायगडमध्ये तुलनेने मोठ्या संख्येने आहे. सगळा कातकरी समाज विस्थापित झाला आहे. उद्ध्वस्त झाला आहे.

नीरज हातेकरांनी फेसबुकवर पूनमबद्दल पोस्ट लिहली. याचा आनंद हातेकरांना होणं स्वाभाविक आहे. आदिवासींमध्ये काम करणारे लोक काही कमी नाहीत. हातेकरांचं वैशिष्ट्य असं की आपण आदिवासींसाठी काम करतो हे ते कधी सांगत नाहीत. आदिवासींचं नेतृत्व बिगर आदिवासींनी करू नये ही हातेकरांची भूमिका आहे. त्यामुळे आदिवासींमधलं नेतृत्व शोधण्याचं आणि त्यांना उचित संधी मिळण्यासाठी मार्गदर्शन करणं एवढीच त्यांनी आपली भूमिका निश्चित केली आहे.

कातकरी समाजातल्या या मुलीचं कौतुक यासाठी की आजही या समाजातील मुलं शिकत नाहीत. मुली तर बिलकुल नाहीत. वीटभट्ट्यांवरच्या त्यांच्या शोषणाच्या तर अनेक कथा आहेत. कुठे सालगडी तर कुठे वेठबिगारी. आदिवासींमधला सगळ्यात मागे पडलेला जो घटक आहेत त्यापैकी हा कातकरी आहे. (महाराष्ट्रात 1 लाखाच्या आसपास कातकरी कुटुंब आहेत. एकूण लोकसंख्येच्या 9.50 टक्के आदिवासी समाज राज्यात आहे.) त्यातून पूनम वकील होते म्हणून तिचं कौतुक आहे.

उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यातील आदिवासी मुलं तशी खूप पुढे गेली. महाराष्ट्रात त्यामानाने पुरोगामी राज्य असूनही हे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. 'मरांग गोमके' जयपाल सिंह मुंडा यांनी भारताला हॉकीमधलं पहिलं ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळवून दिलं. संविधान सभेत योगदान दिलं. तरीही इतिहास लेखनात त्यांना जागा नाही. बिरसा मुंडा आणि जयपालसिंग यांचं उलगुलान पूनम हिलमच्या सनदेतून यापुढे प्रगटत राहील आणि जीवनाच्या सगळ्या आघाड्यांवर आदिवासी तरुणही त्याच स्वाभिमानाने पुन्हा उभे राहतील, ही अपेक्षा. पूनमला भरपूर शुभेच्छा!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News